मंगळवार, ५ जून, २०१८

सांज मैफिल



सांज मैफिल

खूप खूप वर्षांनी
जुन्या मित्रांच्या कोंडाळ्यात
गावाच्या वेशीवर
असतांना भटकत
आठवणींचे मोहळ
असतांना जागवत
येऊन ठेपली सांजवेळ
प्रकाश वस्त्र आवरत
अशोक  गप्प्या राजू दिलीप
किती बोलू किती सांगू
असंख्य घटना शब्द कथा
प्रत्येकाच्या गाठोडित

पाखरांची किलबिल हळू होत गेली
विंचरणेची खळखळ जाणवू लागली
दूरवर स्टँडवरचे दिवे लागले
अन् मित्रांचे पाय घराकडे वळू लागले

त्या संध्याकाळी
आम्ही वाटलेली असतात
हरवून गेलेली कित्येक वर्ष
भरलेल्या असतात
अनेक रिकाम्या जागा
अन सोडवलेली
कित्येक अधुरी उदाहरण
ते बाक ती शाळा ती घंटा
ते खेळ ते क्रीडांगण तो धिंगाना
एका सांजेत उलगडलेले सारे बालपण

तो पूल ते पाणी तो वारा
त्या गप्पा ते हास्य त्या टाळ्या
या सार्‍यांचे जणू
एक रसरशीत तैलचित्रच
होऊन बसले आहे मनात
भूतकाळाच्या दिवाणखान्यात
अन कुठल्यातरी निवांत क्षणी
पडताच त्यावर नजर
ओघळतात त्यातून अजूनही
तेच ते निरागस मैत्रीचे रंग
गहिऱ्या सांजरंगात मिसळून
गप्पांच्या मैफिलीचा कलौळ
टाकतो आसमंत भरून


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
Http://kavitesathikavita.blogspot.in



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ज्ञानदेवी .

ज्ञानदेवी ******* शब्द सोनियाचे अर्थ मोतीयाचे  भाव अमृताचे काठोकाठ ॥१ स्वप्न भाविकांचे गीत साधकांचे  गुज योगियांचे अद्भुत हे ॥२ ...