सोमवार, ४ जून, २०१८

सांज लय


सांज लय

सांजवेळी एकटाच
घराच्या मी छतावर
पश्चिमेचे गार वारे
घेत मंद अंगावर

न्याहाळत होतो सुर्य
तदाकार होत होत
विसरले देहभान
जाणीवेला आक्रसत

कृष्णमेघ इवलाले
भेदूनिया मज गेले
किरणांचे मृदू स्पर्श
अंतरात उतरले

हळू हळू मीच झालो
माझ्यातील आकाशाचा
अंतरात मग फूटे
झरा एक आनंदाचा

जाणिवेत उमलले
लक्ष ग्रह गोल तारे
विश्व होतो पाहात मी
कवळून सारे सारे

सांजवेळ झाली तेव्हा
वेळ सुवर्ण साजरी
कृष्णजींचे शब्द गुढ
रुणझुणले अंतरी

कालातीत असे काही
मज भेटुनिया गेले
नामातीत गुढगम्य
अंतरात उमटले

(कृष्णजी=जे.कृष्णमूर्ती )

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
Http://kavitesathikavita.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...