भार
***
जेव्हा तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा
भार होतो कुणालाही
अगदी जाणून बुजून
अथवा कळत नकळतही
तेव्हा याचा अर्थ
असाच निघतो की
तुम्ही खरोखर लायक नाही
निखळ मानव्याची
प्रांजळ बिरुदावली मिरवण्यासाठी !
सत्तेचा दंड हातात आल्यावर
येणारी कठोरता
अपरिहार्य असेलही
कधीकाळी केंव्हातरी
पण लोकांनी तुमचा
आदर करायचा सोडून
द्वेष करावे असे वर्तन
घडते तुमच्या हातून
तेव्हा नक्कीच समजा
तुम्हाला माणूस व्हायचे
बाकी आहे अजून
आयुष्यात दुःख अपमान
पराभव अन्याय येतो
साऱ्यांच्याच वाट्याला
गरज नाही मधुरता मिळेल
हाती आलेल्या प्रत्येक फळाला
त्या न जिरलेल्या दुःखाची वाफ
भाजवत असेल तुम्हाला
त्या ठसठसणाऱ्या अपमानाच्या
असह्य वेदना डसत असेल
तुमच्या काळजाला
त्या जळलेल्या सुखाच्या धुराने
अंधत्व आले असेल डोळ्याला
अन् या नको त्या गोष्टी घेऊन
वावरत असाल तुम्ही
तर खरंच सांगतोय
या जगाच्या पाठीवर
तुमच्या एवढे दुर्दैवी कोणीच नाही
डॉ .विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा