शनिवार, ५ जून, २०२१

शोध अंतरी

शोध रे अंतरी
*******:***

आणिक ती भेटी
काय घ्यावी दत्ता
सदैव तू चित्ता 
बसलेला ॥१

यावे गिरनारी
वाडीला अथवा 
जरी वाटे जीवा
सदोदित ॥२

चैतन्याचे गाणे 
फुटे देहातून  
येताची धावून 
तया स्थळी ॥३

परी देश काले 
घडेना ती सेवा 
म्हणूनिया दैवा
रुष्टु नये ॥४

जणू सांगे दत्त 
शोध रे अंतरी 
शोध आतातरी 
वळूनिया ॥५

शोधले बाहेरी 
तुवा आजवरी 
झाले ते बहुरी 
आता पुरे ॥

विक्रांत अंतरी 
पाहतो दत्ताला 
पूजतो पदाला 
सुखावून ॥६



🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

गुरुवार, ३ जून, २०२१

दत्तदेव शिरी


दत्तदेव शिरी 
*********

दत्तदेव शिरी 
ज्ञानदेव उरी 
प्राणात श्रीहरी 
सोहं भाव 

तयाच्या खेळात
रमतो सुखाने 
दासाचे गाणे 
आळवितो 

संत सज्जनांचे 
योगीया भक्तांचे 
बोल मनी साचे 
साठवतो 

आता आताच ही 
चालू लागे वाट
झाली सुरुवात 
याच जन्मी

काय सांगू पण
सुखाचे हे सुख 
तया नाही मुख
बोलावया

कुठल्या जन्माचे 
पुण्य आले फळा 
लागला डोहळा 
स्मरणाचा

सगुण-निर्गुण 
गुणातीत गुण 
बुडालो संपूर्ण 
आनंदात

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

बुधवार, २ जून, २०२१

प्रेत टाळू लोणी

प्रेत टाळू लोणी
******

प्रेत टाळूवरी 
ठेवियले लोणी 
पाहिले मी कोणी 
खाणारे ते ॥

तया मोठा मान 
जगती सन्मान 
खोटे पुण्यवान 
धूर्त मोठे ॥

सत्ता संडासाचा 
तया अभिमान 
तर्र ते पिऊन 
उपमर्द ॥

कृमी कीटक ते
जणू नरकाचे 
वस्त्र रेशमाचे 
पांघरले ॥

धन हाच धर्म 
तीच तया निष्ठा 
सुवर्णाची विष्ठा 
सुखविती ॥

जन्म कोटी दुःख 
तया ललाटासी 
पापे महाराशी
केली त्यांनी ॥

विक्रांता करूणा
पाहुनिया तया 
देई देवराया 
बुद्धी जरा ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

मंगळवार, १ जून, २०२१

मज खुणावते




मज खुणावते 
🌸🌸🌸

नको धन मान 
नको मोठेपण 
सुख भोगी मन 
नको आता ॥

दयाळा विटलो 
सारे संभाळता 
भार  होई चित्ता 
आता सारे ॥

देई रे कफनी 
देई रे कटोरा 
सांडून पसारा 
जावे वाटे ॥

आकाशाचे छत 
मज खुणावते 
धरा ये  म्हणते 
रहायला ॥

कुठवर साहू 
अडले नकार 
एकांता होकार 
कधी देऊ ॥

येई दत्तात्रेया 
येई रे हदया 
जाणून सदया 
भाव माझा ॥

विक्रांत जगात 
परक्या घरात 
तुझं आठवत
राहतो रे ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

सोमवार, ३१ मे, २०२१

माझ्यातला मी

माझ्यातला "मी"
🌵🌵🌵🌵

माझ्यातला "मी "
मला न कळतो 
परी चालवतो 
जीवनाला ॥

माझेपणी उभी 
जीवनाची सत्ता 
परी '"मी"' चा गाता 
सापडेना ॥

जोडू मोडुनिया 
"मी" च्या सावलीला 
वाहतो कोणाला 
कोण येथे ॥

म्हणतो "मी" ज्याला 
लागेना हाताला 
पारा पकडला 
चिमटीत ॥

आहे तरी नाही 
असा "मी" जो काही 
जैसा जैसा पाही 
सर्वकाळ ॥

फुटू देत दत्ता 
"मी" पण गोठले
जाणिवी निदेले
विक्रांतच्या ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

रविवार, ३० मे, २०२१

अमृत अंगणी


अमृत अंगणी
*********

ज्ञानदेव मेघ
करुणा अपार
वोळे वारंवार
विश्वासाठी ॥

म्हणुनिया चाड
उपजली चित्ती
आपण कोण ती
जाणण्याची ॥

अमृत अंगणी 
चोच उघडूनी 
चातक होवूनी 
उभा राही ॥

कुठला थेंब तो 
असेल रे माझा
कुठल्या ढगांचा 
ठाव नाही  ॥

थेंबा थेंबावर 
काय नाव असे
ठाऊक ते नसे
मज लागी ॥

असंख्य अपार 
बरसती मोती 
जयास भेटती
भाग्याचे ते  ॥

परी या पक्षाची 
इवलीशी आर्ती 
थेंबुट्या पुरती 
ज्ञानदेवा ॥

होईल सुदैवी 
विक्रांत जगता
कृपेची लाभता 
तुझी सर ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

 

शनिवार, २९ मे, २०२१

गजवदना


गजवदना
🌺🌺🌺

हे गजवदना 
गौरी नंदना 
नमितो चरणा 
मी तव बालक ॥

देवा दयाळू 
भक्तवत्सलु 
सदा कृपाळू 
नाव तुझे रे ॥

मंगल चरणी 
तुम्हीच येउनी 
घेता करूनी 
कार्य सारी ॥

तुजला पाहता 
विघ्न पळती 
सुखा उगवती 
कोंब नवे रे ॥

तुझ्या भक्तीविन 
अन्य न  मागणं 
मी हेच मागणं 
मागे तुजला ॥

नामस्मरणी 
चित्त रंगुनी 
तल्लीन होऊनी 
जावू द्या ॥

तुझ्या प्रीतीचे 
भावभक्तीचे 
गाणं हे साचे 
मला स्फुरो ॥

शब्द लाघव 
मनीचे मार्दव 
अचूक भाव 
साकारू द्या ॥

तुझेच घेऊन 
तुजला वाहून 
करतो नमन 
सर्वाधिशा ॥

विक्रांत अज्ञानी 
घे सांभाळूनी 
जनी वनी मनी 
अन एकांती ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...