रविवार, १९ जुलै, २०२०

भित्री श्रद्धा

 श्रद्धा
***********

बाजार भितीचा
हिशोब दानाचा 
काल त्या सर्पाचा
त्रिंबकीच्या॥

जुनाट शब्दांचे 
विना कि श्रमांचे
प्रकार तयांचे
कमावयाचे  ॥

होती जाहिरती
दलाल असती
मुळ परि भिती
अनिष्टाची॥

तयारी यज्ञाची
मांडणी पुजेची  
त्याच सामानाची 
सदोदित ॥

झुकती दुनिया
देवा तुझी माया
मज न ये आया
मजेशीर ॥

दत्त काढी मन 
माझे सा-यातून 
अवघे दावून
निरर्थक  ॥

 
 *****
 डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com

गोरक्षाची काठी

गोरक्षाची काठी
***************
गोरक्षाची काठी 
पडली डोक्यात 
टेंगूळ माथ्यात 
येऊनिया ॥

गोरक्षाची काठी 
पडे पेकाटात 
बसे बोंबलत 
आणिक मी ॥

बोंबललो असा
कानफाटा होत
जाऊन उलट
जीभ आत ॥

डोळे फिरवता 
श्वास अडकता 
पाठीत धपाटा 
पडला तो ॥

गोरक्ष धपाटा 
सुखाची उकळी 
पोटाच्या उखळी 
उतो येते ॥

उकळता नाद
दुमदुमे आत
आग नि पोटात
पेटतसे॥

असा हा  प्रवास 
पाहूनिया त्रास 
माऊलीचा श्वास 
ओलावला ॥

माऊली प्रेमाने 
भरविते घास 
सरतो सायास
भोगलेला ॥

गोरक्षाची काठी 
धरूनिया हाती 
उभारतो गुढी 
मग मीच ॥

विक्रांता गोरक्ष 
धावला पावला 
मस्तकी ठेविला 
कृपा कर ॥
****
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com

विकली श्रद्धा

विकली श्रद्धा 
***********

विकल्या श्रद्धेला 
दारिद्र्य आधार 
पेरती  अपार
धनराशी ॥

वांझोट्या शब्दांचे 
आतल्या गाठीचे 
प्रकार तयांचे
अर्थ शून्य ॥

वाजती गाजती
जगी मिरवती
त्यास त्याच्या पथी
जाऊ द्यावे ॥

अहा ते नाटकी
दाविति फुकाचे 
घेती कि चुकांचे
पाप माथी

मग दानशूर 
होवून निश्चिंत
नवीन शोधत 
जाती सावज  ॥

ऐसे दत्तात्रेया
पाहतो डोळ्यांनी 
धुर्तांची वाहणी
विपरित ॥

दत्ता  काढी तण
 हे रे देशातून 
बघ उपटून
समुळ ते ॥

विक्रांत कर्माचा 
हिंदवी धर्माचा 
उघड्या डोळ्यांचा 
सांगे बात  ॥ 
 *****
 डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com

शनिवार, १८ जुलै, २०२०

विटाळ

 पापाचा विटाळ 
************

पापाचा विटाळ 
फक्त एक मान 
सोवळे ते जाण
उपकार  ॥

सोवळे ओवळे
विटाळ पाळणे
काय ते जगणे
शहाणे रे ॥ 

देहाधा-या कैचा 
स्पर्शाचा विटाळ 
मानवा  किटाळ 
असे हे रे॥

अहो भाविकांनो
होऊन डोळस 
मिरवा कळस 
धर्माचा या ॥

काही  करा छान
बांधाबांध नवी 
तोडफोड हवी
तर ती ही ॥

तरीच उज्वल
धर्म हा जगेल 
आणि मिरवेल
विश्वामध्ये ॥

वृक्ष  ऐसा थोर
अमृत फळाचा
होवो जगताचा  
आश्वासक  ॥

विक्रांत संताच्या 
पायातली धूळ 
तयांचे सकळ 
बोल बोले.॥
*
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

गुरुवार, १६ जुलै, २०२०

शुभेच्छा 
****:::
झळाळत्या किरणांचे 
यश मिळो सदा तुला 
स्वप्न तुझे प्रकाशाचे 
नित्य येवो आकाराला 

यश तुझे सुवर्णाचे 
हो दुर्मिळ कौतुकाचे 
यश तुझे पोलादाचे 
कणखर टिकायाचे 

यशा नको गालबोट 
धन मान उगा खोट 
मूल्य मापा वाचून जे 
भिडो आकाशाला थेट 

हीच मनिषा सर्वांची 
आशा आणि आशिषांची 
उडा उडा रे गगणी 
सीमा नको क्षितिजाची.
**
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

शब्द सागरात

शब्द सागरात 
**********

त्याच त्या शब्दात 
चाललो वाहत
स्वतःला पाहत 
गुंतलेला ॥

तीच आटाअटी 
शब्द जोडाजोडी 
मूल्य ना कवडी 
जरी त्याला ॥

शब्दांचा डोंगर 
उभा माथ्यावर 
कोण कोणावर 
कृपा करी ॥

सुवर्ण ही भार
पत्थर ही भार
जड  उरावर 
मणभर ॥

देव दत्तात्रेय 
वाहतो म्हणून 
चालणे अजुन
घडे काही ॥

अन्यथा विक्रांत 
शब्द सागरात 
बुडून मरत 
होता नक्की॥

विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

सोमवार, १३ जुलै, २०२०

नवनाथ कथा

नवनाथ कथा
**********:

का बरे कथेत 
देव हरविले 
गौण ते जाहले 
नाथा हाती ॥१॥

कळण्या आम्हास
नाही ते रे खास 
आप आपणास  
उद्धरावे ॥२॥

अवघे हे नाथ 
जहाले समर्थ 
धरुनिया पथ
साधनेचा ॥३॥

थकल्या वाचून
करा रे सायास
सांगती आम्हास 
आत्म शोधा ॥४॥

विक्रांती जाणले 
नाथांना पाहिले 
हृदयी धरीले
म्हणूनिया॥५॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...