बुधवार, १८ डिसेंबर, २०१९

दत्ताने वेढला




दत्ताने वेढला
*********

तुज लागी दिले
मन माझे देवा
आणिक ती सेवा
करू काय ॥

लावी कामकाजा
लावी व्यवहारा
लोक उपकारा
मर्जी तुझी ॥


घाली ज्ञान चारा
देई ध्यान वारा
भक्तीचा साजरा
वृक्ष करी ॥

हरेक प्रवाहा
आश्रयो उदारा
गंभीरा सागरा 
कृपानिधि   ॥

होऊनी तुझा मी
मागतो तुजला
द्वैतात प्रेमाला
बळ भारी ॥

विक्रांत वेगळा
हिम पाण्यातला
दत्ताने वेढला
सर्वव्यापी ॥

 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

मंगळवार, १७ डिसेंबर, २०१९

मोडली चाकोरी




मोडली चाकोरी
*****
पडोनिया गेला
बघ हातातला
संशय जोडला
जीवाने या॥

सुटोनिया पळे
बळे जो बांधला
श्रद्धेच्या खुंट्याला
अहंकार ॥

मोडले तोडले
घर ते बांधले
आशेचे थोरले
साक्षात्कारी ॥

उदास वासना
जळे संवेदना
दत्ताची कामना
जोपासली ॥

विक्रांत उघडा
जाहला डोंगर
वृक्ष माथ्यावर
पेटलेला ॥

पाहातो कौतुक
दत्त अभ्यंतरी
मोडली चाकोरी
गंतव्याची ॥

 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

++++

सोमवार, १६ डिसेंबर, २०१९

बीज



बीज
***
बीजाचा विस्फोट
जाहला समूळ
म्हणूनिया मूळ
रुजू आले ॥


किडल्या बीजास
काय गती असे
माती होत हसे
कणकण ॥


भाग्याचे अंकुर
भेटली कुणास
हिरवे पणास
लपेटून ॥


जीवनाचे खेळ
जीवना ठाऊक
जगणे घाऊक
जगणाऱ्या ॥


केवळ ही कृपा
करी माय बापा
पुण्य अन् पापा
मोजू नको ॥


विक्रांत बीजात
कोटी संभावना
परी थेंबा विना
उणा दुणा ॥


ओघळ पाघळ
दयेच्या दयाळ
श्रीदत्त कृपाळ
दयाघना ॥


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
++++

 

रविवार, १५ डिसेंबर, २०१९

तव दारातले



तव दारातले
************
तू टाळ मज
 हवे तेवढे
मी तो कुतरे
तव दारातले

तू ठेव उपाशी
दे तुकड्यांची
 न जाईन दुज्या
 परी दारांशी

तू घाल लाथ
कधी पेकाटी
वा ठेव हात या
माथ्यावरती

तुजला धरीतो
मी हृदयाशी
चाड न मजला
अन्य कशाशी

मज ना कळते
कसे वागावे
तव प्रेम ते
कसे मिळवावे

करशील तेव्हा
करी करुणा
तोवर विक्रांत
राहिन चरणा

 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

++++


शनिवार, १४ डिसेंबर, २०१९

पर्व




पर्व
***

हे ही एक पर्व आहे
तेही एक पर्व होते
मनाचे खेळ मनाने
मांडलेले सर्व होते

निराकारी आकाराचे
लागलेले वेध होते
त्याच त्याच वाटेवर
फिरणारे शोध होते

संवेदना जाणावया
हवे इंद्रिय असते
गंध घ्राणा रूप डोळा
सारे ठरले असते

त्यात सीमेत ओढणे
तुज मज भाग होते
भक्तीच्या पडद्यावरी
चित्र उमटत होते

ठाऊक जरी ते सारे
भ्रम मनाचेच होते
विरघळून त्यात मज
परंतु जायचे होते

अन् फाटला पडदा
थांबले विरघळणे
होते रंग नाद जरी
नव्हते परी दिसणे

अंतिम हे दिसणे वा
पर्व अजून घडणे
ठाव नाही पाहणाऱ्या
का" आहे " उभे   "मी पणे  "

 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

शुक्रवार, १३ डिसेंबर, २०१९

गोरक्षनाथ



गोरक्षनाथ
*******

जन्म राखेतून झाला
कधी लिप्त न कशाला
काम क्रोध लोभ मोह
कधी जाती ना वाट्याला

असा गोरक्ष तपस्वी
थोर जाहला जगती
नाथपंथी मिरवला
जणू स्वयं की धूर्जटी

भ्याला गर्भवास ज्याला
नाथपंथाचा तो चेला
गुरू पदाचा अढळ
ध्रुवतारा नभातला

गुरू प्रेमासाठी ज्याने
अक्ष क्षणात तो दिला
केली परीक्षा उत्तीर्ण
नग सोनियाचा केला

नारी राज्यात जाऊन
गुरू मच्छिंद्र आणले
आर्त जनावरी साऱया
थोर उपकार केले

परिसीमा वैराग्याची
असे अवधी तपाची
मुर्त साकार प्रेमाची
तात मात गहिनीची

तो हा गोरक्ष सोयरा
सदा राहो मनामाजी
धूळ विक्रांता किंचित
लागो तयाच्या पायाची




© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

गुरुवार, १२ डिसेंबर, २०१९

मच्छिंद्रनाथ




मच्छिंद्रनाथ

***
श्रीमच्छिंद्रनाथ यती 
जरी पुत्र धीवराचा
म्हणे प्रेमे पंथ अंश
कवी नारायणाचा

थोर कुणीही जन्माने
नसतो इथे कधीही
दाविले स्वतेजे त्यांनी
जिंकूनिया देव मही

जनतेच्या सुखासाठी
तपी अनंत कष्टाला
शाबरी ती मंत्र विद्या
दिली आर्त जगताला

नवे मंत्र नवे तंत्र
उभारला नाथ पंथ
तया दिले देवपण
निर्मियले नवे वेद


जाती पाती मोडूनिया
बहुजना गुरू केले
देवतत्त्व हरवून
यत्न सिद्ध मिरविले

असा थोर बंडखोर
कृपा करी जगावर
मातीतून राखेतून
घडविले अवतार
**

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...