बुधवार, २७ नोव्हेंबर, २०१९

नको आढ्यता



नको आढ्यता

*************



पुरे झाली आता 

दिलेली तू सत्ता 

करी पुन्हा छोटा

मज दत्ता



नको नको ऐसे 

बसवू आकाशी 

राहू दे पायाशी 

सदोदित 



नको रे उपाधी 

नको यातायाती

पडणे संकटी 

भक्ती हीन



करी तुझा दास 

इवला जगात 

आढ्यता मनात

नच यावी 



सुटो हलकेच 

संसाराच्या गाठी 

भक्तीचिया काठी

वस्ती व्हावी 



पाहतो विक्रांत 

हेच एक स्वप्न 

दत्त पदी जन्म 

 जावो सारा



 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

*--**

मंगळवार, २६ नोव्हेंबर, २०१९

देई सानपणा


***
देई बा श्री दत्ता 
मज सानपण
ठेवी पांघरून 
नगण्यत्व .
देई साधू संग 
देई भक्तजन 
त्यात मिसळून 
राहू दे रे 
करू नको दत्ता 
आगळा वेगळा 
हाती घेतलेला 
राजदंड 
करू नको स्वामी 
अज्ञानी जनाचा 
जयाला देहाचा 
सोस फक्त 
उडो आभाळात 
मनाचे पाखरू 
निळ्या गहिवरू 
सदा राहो  
विक्रांत कृपेचा 
मागे तव हात 
वाढी अहं ज्यात 
नको ते रे



© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
**

सोमवार, २५ नोव्हेंबर, २०१९

सल ही निवारा

  



सल ही निवारा
 *******
रुतलेला काटा 
सलतो पायात 
दर पावलात 
कळ माथी 

कैसे मी चालावे
कुणाचे सांगावे 
दुःख हे सांडावे 
कुण्या हाती 

जन्मा आलो हीच 
सल आहे थोर 
होऊनिया ढोर 
जगे जगी 

का रे तू घातलें 
मजला देहात 
भोगात रोगात 
काळ गामी 

होऊनिया वैद्य 
धावरे उदारा 
सल ही निवारा 
दत्तात्रेया


 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

**
***

रविवार, २४ नोव्हेंबर, २०१९

त्रिगुण

सुखातला वाटा 
हवाय मजला 
घास तुपातला 
मुद्दलात 

पोट भरलेले 
खिसे भरलेले 
पाहिजे भरले 
अजून ती 

कोण किती कुठे 
होणार रे मोठा 
मिरविण्या ताठा
किती काळ 

नकाच विचारू 
असे प्रश्न काही 
आसक्तीला नाही 
अंतपार 

विक्रांत पाहतो 
दत्ता विचारतो 
मज का करतो 
ऐसा देवा 

बोलल्यावाचून 
दावी तो त्रिगुण
सिद्धान्त हसून 
मजलागी 

अवघे कळून 
अंतरी वळून 
राहतो पडून 
मग मी ही


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शनिवार, २३ नोव्हेंबर, २०१९

सुत्रधार अवधुत




सुत्रधार अवधुत
***********
चाले पोर खेळ
अवघा गोंधळ
श्रीदत्ता सांभाळ
जगाशी या
लबाड नाठाळ
करी चळवळ
हट्टांचे केवळ
मुर्त रुप
कधी होती पोर
कधी होती थोर
कधी होती चोर
सहजीच
तया हवा खावू
सारा गोड गोड
तया साठी धाड
घाली कुठे
देवून थकलो
सांगुन दमलो
कधी रागावलो
व्यर्थ पणे
करी ते सज्ञान
देई काही भान
जगाचे कल्याण
घडो मग
विक्रांत उगाच
करी हळहळ
जर सुत्रधार
अवधुत
© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

भक्तीचिया वाटा




***
देहाची फिकीर 
आहे रे कोणाला 
तुजला वाहिला 
दत्तात्रेया॥

जगाची फिकीर 
आहे रे कोणाला 
तुच भरलेला 
दिसे येथे ॥

प्राप्तीची फिकीर 
आहे रे कोणाला 
प्रेमी आळविला 
तूची मस्त ॥

प्रेमाचा आकार
कळे ना कुणाला 
मनी दाटलेला 
देवा तुच  ॥

पाहू जाता सारे 
गमे इवलेसे 
तव प्रेमा पिसे 
भुललो रे ॥

देई तुझे प्रेम
विक्रांता या दत्ता 
भक्तीचिया वाटा 
नेई बळे ॥



© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
**

शुक्रवार, २२ नोव्हेंबर, २०१९

ज्ञानदेवा


ज्ञानदेवा
*******

मागतो तुजला
एकच मी दान
कृपेचे कवन
करि मज ॥
जरा हे शब्दांचे
तेज मावळून
घडू दे दर्शन
गाभ्यातले ॥
मागतो चांदणे
चकोराच्या चोची
प्रभा निरभ्राची
दिसो मज ॥
थिल्लराचे जीणे
नको नको आता
व्हावा मी वाहता
महा ओघ  ॥
परी घडे सारे
तव कृपा बळे
एवढेच कळे
मज लागी ॥
म्हणूनिया पायी
ठेवी सदा माथा
सांभाळ विक्रांता
ज्ञानदेवा॥
***
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http ://kavitesathikavita.blogspot.com

आसावरी ताई श्रद्धांजली

रंग *** ( आसावरीताई काकडे ) रंग रेषा आणि शब्द  यात जीवा गुंतवूनी  एक निर्मळ आयुष्य  जगली ती मनस्विनी  खिडकीतील इवली तीच फुले आणि...