रविवार, ९ जून, २०१९

तुझा हात





तुझा हात 
********
तुझा हात होता 
युगांची विश्रांती 
थकलेल्या मना 
संजीवनी बुटी 

प्रेममय हाती 
ऊर्जेचे भांडार 
चैतन्याची आभा 
स्नेहाचे आगार 

तुझा हात होता 
सुखाची सावली 
दमल्या जीवाची 
सरली काहिली  

आकाश ओंजळ 
मेघांनी भरली 
आशा अंकुरली 
जीवनी सजली 

तुझा हात होता 
पाठीत धपाटा 
चुकता पाऊल 
वाट दाखवता 

सदा संकटात 
उचलून घेता 
वादळवाऱ्यात 
छत सांभाळता 

तुज कैसे म्हणू
आभार बोलांनी 
आणि उतराई 
पाठीत वाकूनी॥

करू देहाची या 
पायाची वाहाण 
करू काळजाचे 
किंवा लिंबलोण 

कळेना मजला 
म्हणून मी मौन 
होवूनी पदी तव 
राहतो पडून॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
००००००

निमित्त


निमित्त

******
तसे तर सारेच
जाणार आहोत आपण
पण जायला निमित्त लागते
अवचित कधी येणाऱ्या
आजारपणाचे
तापाचे टीबीचे मेंदू ज्वराचे
अर्धांगवायू वा हृदयविकाराचे
कधी कुणालाही नकोशा वाटणाऱ्या
कर्करोगाचे वा अपघाताचे
ही सारी निमित्त
का असावीत
जगातून जायला
यांचे उत्तर मजकडे तर नाहीच
पण कधीच नाही कोणाकडेही
कुठल्याही निमित्ता वाचून
कुठल्याही जबरदस्ती वाचून
जाता येईल का मला
या जीवनातून
हळुवार निसटून ?
माझी जाण्याची इच्छा
हीच एक निमित्त होऊन
एक संतृप्त जीवन जगून

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
००००००

शनिवार, ८ जून, २०१९

दत्ता शिणलो रे



दत्ता शिणलो रे
************

दत्ता शिणलो रे शिणलो
तुझिया पदी मी आलो ॥
आता सरली रे ताकद
करी करुणा हे भगवंत ॥
जीव हा जगी होरपळे
करी तू वर्षा  कृपाळे ॥
तुज वाचून रे मजला
कुणी नाही रे दयाळा ॥
जन्म गेला रे वाया
व्यर्थ शिणली ही काया॥
करू नको रे अव्हेर
कृपा करी दासावर ॥
विक्रांत भवात  बुडता
बोल लागेल तुज दत्ता ॥

 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
००००००

शुक्रवार, ७ जून, २०१९

दत्त बोलावणे




दत्ता तुझे बोलावणे
***************
किती करू मी बहाणे
किती टाळू आणि येणे
कानी रोज निनादते
दत्ता तुझे बोलावणे ॥
संसाराची गोडी वेडी
वाढे आणखीन थोडी
मग रोज उदयावरी
जावूनिया थांबे गाडी ॥
ऐसा कैसा तू रे हट्टी
थट्टा करी जागोजागी
घाली पाडी तोंडघशी
अपमानाच्या वा आगी ॥
दारिद्रयाची देसी गादी
उपवासे पोट भरी
कानी कपाळी सतत
अनित्याचे गाण करी ॥
खेचूनिया नेशी तिथे
वैराग्यांच्या होती बाता
अचूकश्या मिळे लाथा
मोहबळे कुठे जाता ॥
होतो ऋजु कठोरसा
मातेसम माझ्यासाठी
ठेचा नि चटक्यातुनी
दत्त नाव आणी ओठी ॥
द्वाड कार्ट विक्रांत हे
सांभाळ रे आता तुझे
दत्त प्रेमे सदा नाचे
ऐसे काही देई भोजे ॥
© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


गुरुवार, ६ जून, २०१९

साधू



साधू
*****
चिलीमीचे कश भरत ते होते
सवे काही बं बं घुमत ते होते
अध्यात्म तयांचे असले कसले 
मजला मुळीच कळत नव्हते


जरी या जगाचे काहीच तयाला
सोयर सुतक मुळी ते नव्हते
भस्म देहावर टिळा भालावर
डोई वेढलेले जटाभार होते
गूढ शब्द काही ओठात तयांच्या
डोळ्यात जग वेगळेच होते
कुणी पोटभरू खरे कुणी होते
धुम्री मस्त कुणी त्यांचे तेच होते
विक्रांत तयाला नमितो दुरुनी
आग हाती घ्याया सांगा कोण जाते
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
००००००

बुधवार, ५ जून, २०१९

गिरनार पौर्णिमा



गिरनार पौर्णिमा.
*************
शुभ्र चांदण्यात
शुभ्र पायवाट
रुपे पावलात
पसरले ॥

व्यापून नभास
शुभ्र पूर्ण चंद्र
भरला आनंद
पर्णो पर्णी ॥

दूरवर कुठे
गुरूंची शिखर
पदपदावर
परी भेट .॥

भोवती लहरी
वायूच्या नाचती
जणू की सांगती
चाल पुढे ॥

घडले दर्शन
पुण्य आरतीत
दाटे अंतरात
उजेड तो ॥

कुणी दिली भेट
कळे ना कुणास
विक्रांत पूर्वेस
सूर्य झाला॥


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

मंगळवार, ४ जून, २०१९

आरसा




आरसा
******

माझिया मनाचा
आरसा धुळीचा
तुझिया हाताचा
स्पर्श मागे 

मग मी नितळ
होवून केवळ
स्वरूप सोज्वळ
मिरवीन 

अंतरी निर्मळ
प्रेमाचा प्रकाश
अनंत आकाश
होईल रे ॥ 

असा मी घडता
तुज बोलाविता
होईल अनंता
साध्य काही 

मग तू येवून
पाहा डोकावून
मजला देऊन
तुझे पण.॥



© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे


झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...