मंगळवार, २२ ऑगस्ट, २०१७

भिंत

भिंत
******

मला माहित आहे
तू कधीच जगू शकणार नाही
स्वतःसाठी अन्
स्वतःच्या सुखासाठी .

किती अवघडलेली तू
जगाने बांधलेली तू
खुळया मर्यादांचे
लोढणे गळ्यात बांधून
ठेचाळत चालणारी तू
आपल्या चांगुलपणाची
प्रतिमा सांभाळत
अपकीर्तीचे शिंतोडे
अंगावर उडू नये
म्हणून काळजी घेत
सारे मोहर जळून देतेस
दारी आलेला वसंत नाकारत

हे खरे आहे म्हणा की
भिंतीेएवढी सुरक्षितता
या जगात आणखी कुठेही नसते
पण खरंच सांगतो
कदाचित तुला माहित नसेल
या भिंती तुच बांधलेल्या आहेस
आणि हळूहळू तुच एक
भिंत झालेली आहेस
भिंतीचे प्रयोजन संपूनही

http://kavitesathikavita.blogspot.in
डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे 

रविवार, २० ऑगस्ट, २०१७

अवधुत पंथ


अवधुत पंथ

धरिला मी सखी 
अवधूत पथ 
लोकलाज रीत 
गेली माझी ॥
आता मी भिकारी 
महासुख राशी 
झाले वेडीपिशी 
आनंदाने ॥
नको मज मठ 
महाल मंदिर 
देव दिगंबर
आहे माझा ॥
नसे माझ्या मनी 
सुखाची ती आशा 
देहाची  दुराशा 
गोड वाटे ॥ 
जाते दारोदारी 
घेऊन कटोरी 
दत्ताच्या गजरी 
हर्ष होय ॥
मिटताच  डोळे 
प्रकाश लाघव  
सुखाचे अर्णव  
पापण्यात ॥
ऐकते हृदयी 
दत्त दत्त नाद 
भाग्याची वरद 
प्रिय झाले ॥
विक्रांत अंतरी 
सुखांचे वादळ 
सरले समुळ  
जन्म काज ॥

डॉ विक्रांत प्रभाकर  तिकोने 

शुक्रवार, १८ ऑगस्ट, २०१७

शोधणे माझे


शोधणे माझे
**********

लागली आच
शब्दांनी माय
वाचविण्याचे
सरले उपाय

आता लपवू
कुठे स्वत:ला
सारा शून्याचा
सुटे गुंडाळा

धावतो अहं
जरी कासावीस
जमीन उरली
नाही पायास

वाजतो चाबूक
वळ न उमटे
मिटता डोळे
लख्ख दिसते

शोधता काही
हरवून गेले
शोधणे माझे
मीच पहिले

पेटता जाणीव
अंगण भरले
माझे मी पण
माझ्यात वेगळे

डॉ .विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot,in

गुरुवार, १७ ऑगस्ट, २०१७

ज्ञानदेवी चिंतन (लोभाची ती सीमा )प्रतिपादिती अभिचार । आगम जे परमार

ज्ञानदेवी चिंतन (उपक्रमासाठी)


प्रतिपादिती अभिचार । आगम जे परमार । तेही पानीं घेती प्रसर । वासना वेली ॥ १६७/१५

तंव तंव होती थोराडें । अकर्माचीं तळबुडें । आणि जन्मशाखा पुढें पुढें । घेती धाव ॥  १६८ / १५


******

लोभाची ती सीमा
जारण मारण
मनुजा पतन
घोर असे।।

करे परघात
पापमय स्वार्थ
अर्थाचा अनर्थ
घडे मग  ।।

शास्त्र म्हणावे त्या
तरी लाज वाटे
भलते करंटे
निर्मीयते ।।

विस्तारे वासना
करीत कुकर्मा
जीवनाच्या वर्मा
चुकतसे ।।

ऐश्या या प्रमादी
तमाच्या बाजारी
जाती नागवली
चुकलेली ।।

प्राथितो विक्रांत
प्रभो दत्तात्रेया
लोभाची ही माया
दावू नका ।।


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.in

नर्मदा मैयास




नर्मदा मैयास
**********

तुज प्रेमे भेटायचे
तुझ्या तीरी जगायचे
आई तुझ्या करुणेचे
रंग मला पाहायचे

काही माझ्या अस्तित्वाचे
प्रश्न तुला पुसायचे
जन्म पणास लावुनी
उत्तर ते शोधायचे

हटी तटी बसलेले
योगी मुनी पहायचे
झोळीतील सुख त्यांच्या
आहे मला लुटायचे

पुण्यप्रद माती तव
ललाटी या लावायची
होवूनिया सदा तुझा
कुडी तुला वाहायची

ओढ तुझिया कुशीची
गूढ गहिऱ्या पाण्याची
हट्ट पुरा कर माई
आस या विक्रांतची

डॉ .विक्रांत प्रभाकर तिकोणे


मंगळवार, १५ ऑगस्ट, २०१७

तिचे त्याच्या जीवनात डोकावणे





तिचे त्याच्या जीवनात डोकावणे
म्हणजे बागेत भटकणे असते
चार घटका थिजल्या जगात
एक स्पार्क पेटवणे असते

ते चार शब्द मैत्रीचे
ते चार शब्द प्रेमाचे
यातून खरतर
काहीच निष्पन्न होणार नसते
तरीही ते रिझणे मनाचे
हुरहूरणे क्षणांचे
देह मनास मिळणारे
एक संजीवन असते

कदाचित जग त्याला
एक उद्दीपनही म्हणेल
खच्चून मारलेल्या कश सारखे
त्या धुरात त्या क्षणात
हरवून जाते वर्तमान
विसरते सर्व भान
अस्तित्व गुदमरून टाकणारे

तसा तर तोही जळत असतो
प्रत्येकवेळी प्रत्येक श्वासाबरोबर  
त्या सिगारेटच्या टोकावरील
लालबुंद निखाऱ्यागत 
पण ते ओठ
दूर सारायचे विचार
त्याच्या मनातही येत नाही

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
Http://kavitesathikavita.blogspot.in





रविवार, १३ ऑगस्ट, २०१७

वेदना

वेदना
*****


तीच वेदना
तिला पाहतो
हृदयी शोधतो
मी माझिया ।।

जी नच माझी
फक्त असावी
व्यर्थ वहावी
जीवनात ।।

वेदनेचे त्या
होवून गाणे
दाहकतेने
विश्वं सजावे

जसे फुटावे
बीज कुठले
अर्थ साठले
अंतरात

प्रकाश ल्यावे
धरती व्हावे
हरवून जावे
कणोकणी ।।

अस्तित्वाचा
होम होऊनी
यावा प्रकटुनी
हुताशनी ।।

हाती ज्याच्या
फक्त असावे
दिधले देवे
पसायदान ।।

मग असण्याचा
क्षोभ मिटावा
जन्म कळवा
विक्रांता या।।

डॉ विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...