रविवार, २० ऑगस्ट, २०१७

अवधुत पंथ


अवधुत पंथ

धरिला मी सखी 
अवधूत पथ 
लोकलाज रीत 
गेली माझी ॥
आता मी भिकारी 
महासुख राशी 
झाले वेडीपिशी 
आनंदाने ॥
नको मज मठ 
महाल मंदिर 
देव दिगंबर
आहे माझा ॥
नसे माझ्या मनी 
सुखाची ती आशा 
देहाची  दुराशा 
गोड वाटे ॥ 
जाते दारोदारी 
घेऊन कटोरी 
दत्ताच्या गजरी 
हर्ष होय ॥
मिटताच  डोळे 
प्रकाश लाघव  
सुखाचे अर्णव  
पापण्यात ॥
ऐकते हृदयी 
दत्त दत्त नाद 
भाग्याची वरद 
प्रिय झाले ॥
विक्रांत अंतरी 
सुखांचे वादळ 
सरले समुळ  
जन्म काज ॥

डॉ विक्रांत प्रभाकर  तिकोने 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...