रविवार, ६ ऑगस्ट, २०१७

इवले बिंदुले



 इवले बिंदुले
***********

शून्यी प्रकटले
इवले बिंदुले
आकाश भरले
सुर्यकोटी ||

तयाच्या प्रकाशी
आहे पण गेले
देहाचे नूरले
भान काही ||

जाणिवेचा ठसा
जाहला धूसर
सुवर्ण केशर
कणोकणी ||

जीवनाचे कोडे
भासमान झाले
पाण्यात लिहले
शब्द जैसे ||

पै शून्याच्या पैठी
जाहले बैसणे
अर्थी कोंदाटणे
शब्दातीत ||

तमाच्या कल्लोळ
सरला बुडाला
नव्हताच आला
जन्मा कधी ||

उजेड असून
काहीच दिसेना
पाहे कोण कुणा
डोळ्याविना ||

अत्रिचे अंगण
मिळाले आंदण
सारून त्रिगुण
दत्त उभा ||

आसक्तीच्या लाटा
पाहतो कातळ
भिजून केवळ
नाममात्र||

विक्रांत बापुडे
नावाचे कातडे
उगा फडफडे
स्वप्न खोटे  ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
Http://kavitesathikavita.blogspot.in


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

॥श्री गणपती ॥

॥श्री गणपती ॥ 🌺🌺🌺🌺 मुलाधारी मूळ कामनांचे कुळ  साचलेले स्थुळ देहरूपी ॥१ दूर त्या सारावे निर्मळ मी व्हावे  म्हणूनही करावे साधन...