शनिवार, ५ ऑगस्ट, २०१७

उलट हा वृक्ष



ज्ञानदेवी चिंतन

ते ऊर्ध्व आत्मा निर्मळे । अधोर्ध्व सूचित मूळें । बळिया बांधोनि आळें । मायायोगाचे ॥

मग आधिली सदेहांतरे । उठती जिये अपारे । तें चौपासि घेऊनि आगारे । खोलावती ॥

ऐसे भवद्रुमाचें मूळ । हें ऊर्ध्वीं करी बळ । मग आणियांचें बेंचळ । अधीं दावी ॥ ९१,९२,९३/१५

ब्रह्मतत्त्व आणि माया यांच्या दृढ संबंधांचे आळे तयार होऊन त्यात या वृक्षाची निर्मिती होते. असंख्य देहरूपी अंकूर फुटून त्याचा अपार विस्तार होतो. अशा या संसारवृक्षाचे मूळ (माया) ते वरच्या बाजूस म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी रुजले की फांद्यांचा विस्तार सतत वाढत राहातो…


विश्व-संसाराला अश्वत्थ वृक्षाची उपमा देऊन त्याची निर्मिती आणि विस्तार कसा होतो याचे सविस्तर वर्णन केले आहे...

************


उलट हा वृक्ष कुणी लावियेला
विश्वी जो भरला सर्वथैव ।।
असंख्य आकारी विरुढे अपार
फांदीफांदीवर जगत्रय।।

कुणा न कळला कुणी न तोडला
तयात कोंडला जीव खुळा ।।
परी सोडुनिया हिरवा हव्यास
मुळांच्या शेंड्यास जाता कुणी ।।
सुटते दिसणे वृक्षाचे असणे
मायेचे खेळणे हवेतील।।

परि कळेना ती वृक्ष सळसळ
सापडेल मूळ तया कसे ।।
उरी उपजता काही कळकळ
अज्ञान पडळ कळों येता।।
सापडेल वाट जाणारी ती आत
सरूनिया भ्रांत आकाराची ।।

ज्ञानदेवी कृपे शब्दात दिसले
परि ना कळले अनुभवी ।।
शब्द जागवता होऊनिया स्पर्श
उपजावा हर्ष  स्वानंदाचा।।

विक्रांत शरण अन्यन होऊन
वैराग्य घेऊन येई दत्ता।।
ज्ञानाच्या शस्त्राने टाकी रे खंडून
संसार दारुण अधोवृक्ष  ।।


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...