गुरुवार, १० ऑगस्ट, २०१७

संसार वृक्ष (ज्ञानदेवी )




ज्ञानदेवी 

संसार वृक्ष 

जैसा मेघांचेनि तोंडें । सिंधु एकें अंगें काढे । आणि नदी येरीकडे । भरितीचि असती ॥ ११९/१५

तेथ वोहटे ना चढे । ऐसा परिपूर्णुचि आवडे । परी ते फुली जंव नुघडे । मेघांनदींची ॥ १२०/१५

ऐसे या रुखाचें होणेंजाणें । न तर्के होतेनि वहिलेपणें । म्हणौनि लोकु यातें म्हणे । अव्ययु हा ॥ १२१/१५


*********


नद्यांनी भरेना
ढगांनी सरेना
सागर दिसेना
आटलेला

वाहतेय पाणी
थांबल्या वाचूनी
परंतु बांधुनी 
चक्री कुण्या

सारा आखलेला
नीट रेखलेला 
सारा ठरवला
कारभार 

रुख हा वाढतो
गळतो झडतो
अन अंकुरतो
पुनःपुन्हा

अनित्य देहास 
नित्यत्वाचा भास 
जीवन प्रवास 
सत्य वाटे

सातत्य पाहावे 
अव्यय हटावे
पाहणे हटावे 
अंती ते ही 

डोळीयाचा डोळा
काही उघडला 
विक्रांत आंधळा 
केला देवो 

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...