मंगळवार, १७ नोव्हेंबर, २०१५

दत्त पायधूळ







लाथाडते  कुणी | लावे कुणी माथी |
मातीची हि गती | कळे कुणा ||
लोहाचीही  माती | देहाचीही माती |
पंच महाभूती | बांधलेली || 
ऐशा या मातीचा | करुनिया गोळा |
अहंते फुंकला | कैसा कुणी     
मातीचा महाल | नभी पसरला |
आरशी लिंपला | देखणा पै ||
परी काळवशे | पुनरपी माती  |
जन्म मृत्यू किती | भोगतसे  |
विप्राची या माती | का न कळे कशी 
झाली पुण्यराशी | सुकृताने ||
दत्त पायतळी | प्रेमे अंथरली |
पायधूळ झाली | कृपा त्यांची || 

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/




शनिवार, १४ नोव्हेंबर, २०१५

तुझी आठवण









खरच सांगतो
आता न येत
तुझी आठवण
फारशी मनात

जगतो धावत
चक्री अडकत
करी वणवण
उगा दिनरात

थकती गात्रे
प्राण विझती
मृत देहास
कुठली स्मृती

तुझे असणे
होते कधी पण
जगण्यामधले
हळवे स्पंदन

उगाच चालल्या
श्वासा कारण  
उरी खेळती
वीज सणसण

जाता तू पण
गेलीस घेवून
माझे मी पण
कळल्या वाचून

अन आता मी 
जगतोय असे
भिजले विझले
जणू  कोळसे

कधी होते पण
जिवंत जळणे
सांगितल्या विन
असते सांगणे

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


शुक्रवार, १३ नोव्हेंबर, २०१५

श्रीदत्त दिगंबर






पवन गतीने कोण चालले

तेज शलाके विश्व ढवळले

गिरनाराचे ते भाग्य उदेले

श्रीदत्त दिगंबर येथे वसले

महापुण्यवान करवीरस्थान

कि प्रभू मागती भिक्षापान

अहो भाग्याची माय जान्हवी

कि स्नान संध्या देवे करावी

आणिक रजनी अपूर्व माहुरी

जिच्या कुशीत निद्रिस्त मुरारी

कुठे नसे तो कुठे असे तो

सर्वव्यापी परी लीला दावितो

भक्त हृदयी सदैव वसतो

अल्प भक्ती अन धीर पाहतो



 विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...