शनिवार, २५ जुलै, २०१५

लावून घेवू दे दार





अडलेल्या शब्दांनो
रहा असेच अडलेले
जळू देत अंकुर सारे
होण्याआधी पाने फुले

नको नको जीवना
आता दान देवू असे
फेकली मी झोळी अरे
तुझे वैभव घेवू कसे

असेल ही भास हा
मावळतीच्या किरणांचा 
मिटण्याआधी दाटलेला
भ्रम रंगीत प्रकाशाचा

शांत झाला कोल्हाळ
खोल झिरपून अंधार
आता विझू दे अंगार
लावून घेवू दे दार 


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

बुधवार, २२ जुलै, २०१५

येईल परतून..






किती दूर तू नजरेपासून
चंद्र ईदचा दुर्मिळ होवून
अन पुनवही या डोळ्यातून
आषाढाने नेली चोरून

आता काही शब्द लिहिले  
येती हवेवर वदल्यावाचून  
तृषार्थ मन हे माझे ठेवी
जगण्याची आस धरून

कशास होती गाठीभेटी
हृदयबंध हे येती जुळून
घडे अचानक जाणे निघून
उरात जखमा काही घेवून

चल जीवा रे स्वप्न मिटून
अनोळखी या रस्त्यावरून
सखी ठेव गं दीप लावून
कधीतरी मी येईल परतून

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



सोमवार, २० जुलै, २०१५

काय ...



  


सूर काय नि शब्द काय
एक प्याला पिणे असते
जळणाऱ्या जीवास अरे
असे नादी लावणे असते

शिल्प काय नि चित्र काय
सारे सारे विसरणे असते
चालतांना व्यर्थ जगणे 
ते पावूल मोजणे असते

तिचे काय नि माझे काय
हसणे एक बहाणे असते
जुन्या गोष्टी नवी स्वप्ने
उरात जाळणारे गाणे असते 

प्रेम काय अन विरह काय
हाती फक्त वाहणे असते
ठरल्या प्राक्तनाचा भार
माथ्यावर मिरवणे असते


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...