सोमवार, ६ जुलै, २०१५

मृत्यू इयत्ता नववीतला ...





काल अचानक पाहिला मी
मृत्यू इयत्ता नववीतला
खेळता खेळता दारामध्ये  
डाव अखेरचा संपलेला

रोगराई नव्हती कुठली
नव्हता अपघात वा झाला
हसता हसता धावता धावता
होता तो खाली कोसळला

कणखर काटक देह त्याचा
आणि निरागस चेहरा
माती लागली हाता गाला
अंगावरती घाम सुकला

एक विच्छिन्न आक्रोश
साऱ्या रुग्णालयात दाटला
एकमेकांच्या मिठीत रडत    
त्याच्या मायबापांनी केलेला

आग हृदयी पाहणाऱ्याच्या  
डोळ्यात सागर दाटलेला
का ? कश्याने ?या वयात?
प्रश्न साऱ्यास पडलेला

काय कुणा सांगावे मी
अर्थ नव्हता जरतर ला
ट्रॉलीवर तो अलगदपणे
जणू आताच निजलेला   

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

रविवार, ५ जुलै, २०१५

स्पर्श ओले..





आठवांच्या पावसाला
किती धरू कसे धरू
वेचलेले क्षण क्षण
उरी ओझे काय करू

माझ्या सवे जाईलही
माझ्या स्मरणाची गाथा
किती अन कुणा वाटू
देही डोई किती कथा

ठरलेल्या चाकोरीत
वाहुनिया जाते पाणी
नवा ऋतू नवी वर्षा
नवेपनी जुनी गाणी

सांभाळता सांभाळले
हातातून ओघळले
हळू हळू स्पर्श ओले
कुण्या हाती विसावले

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


शनिवार, ४ जुलै, २०१५

मन मोकळे करू म्हटले तर






मन मोकळे करू म्हटले तर
तूच अशी बोलू लागलीस की
त्या शब्दांच्या धबाब्याने  
मी पुन्हा भरून गेलो
हळूच दार अगदी जपून
सावध उघडू लागलो तर
सोसाट्याचा वारा होत तू
आत घुसलीस थेट थेट
अन मी पाचोळा होवून
उगाचच उडतच राहिलो
तुझे आसमानी स्वप्न
तुझे आरसपानी मन
तुझे पेटलेला राग
तुझा उडालेला रंग
या साऱ्या ढंगात
पुन्हा हरवून गेलो
आता आता तर
या मनाचे करायचे काय
हे ही मी विसरुन गेलो
माझे मन गेले आता
तुझे मन माझे झाले
तू वादळ माझ्यातले
मी आकाश तुझे झालो

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/








भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...