बुधवार, ३ जुलै, २०२४

भाजी आणण्यावरून

भाजी आणण्यावरून 
****************
एक भाजी आणण्यावरून 
गढूळ होते वातावरण 
थकलेला तो थकलेली ती पण 
घरंगळले त्राण 
शक्ती गेलेली हरवून 
तो हलत नाही आपल्या जागेवरून 
तिची बोलणी या कानातून 
त्या कानात जातात वाहून
मग ती उठते कुढून चिडून 
काहीतरी ठेवते शिजवून 
त्याचा वाटा बाजूस काढून 
चक्क जाते मग निजून 
काहीही बोलल्या वाचून
प्रश्नास उत्तर दिल्या वाचून 
तोही जातो मग समजून 
मनामध्ये तसाच उबगून 
खावी न खावी भाजी 
थांबतो ठरवल्या वाचून 
खाल्ले नाही काही तर 
भांडण वाढणार असते 
अन खाणे ही तर खरोखर 
त्याचीच हार असते 
मानापनाच्या संभ्रमात 
अखेर भूक जिंकते 
अन उद्याचे भांडण 
पोटामध्ये विझून जाते
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...