मंगळवार, १६ जुलै, २०२४

तरीही

तरीही
*****

हरणे नाही जिंकणे, धरणे नाही सोडणे
इथे केवळ असते आले जीवन जगणे 

लाटा येतात धावत रेषा जातात बुजत
किल्ले वाळूचे पाण्यात अन् जातात वाहत

कोण इथे कोणासाठी आहे बरे थांबलेले ?
धन शंख शिंपल्याचे कुणी आहे सांभाळले ?

मित्र जाती मैत्र जाते प्रिया जाते प्रेम जाते 
विस्मृतीच्या अंधारात जीणे सुखात निजते

लाटा गर्जत असती शंख तुटत असती
सागराच्या वाऱ्यावर स्मृतीही वाहून जाती

ही कथा युगायुगाची सागरा ठाव असते 
खोलवर बुडलेली बोटही जाणत असते

ती तटस्थ प्रसन्नता किनाऱ्यास खिदळत 
किल्ले पाडत स्वप्न सारवत असते वाहत

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

॥श्री गणपती ॥

॥श्री गणपती ॥ 🌺🌺🌺🌺 मुलाधारी मूळ कामनांचे कुळ  साचलेले स्थुळ देहरूपी ॥१ दूर त्या सारावे निर्मळ मी व्हावे  म्हणूनही करावे साधन...