सोमवार, २४ जून, २०२४

मौन


मौन
****
तुझे बोलणे थांबते माझे मौन घनावते
शब्दावाचूनही काही स्पर्शातून बरसते ॥१

शब्द शब्द वादळतो अर्थ अर्थ निनादतो 
जीवतळी निजलेला कणकण जागा होतो ॥२

तुझे बोल थांबू नये जरी मनास वाटते
तुझे अबोल मार्दव मज धुंद वेडावते ॥३

तुझ्या सुरी सुरावतो श्वास माझा झंकारतो 
क्षण क्षण सवे तुझ्या जन्म जणू मी जगतो ॥४

तुझे मौन ही अल्लड मज दूर कुठे नेते 
स्वप्नजागृती धूसर सुख सुखात भिजते ॥५

तुझे मौन माझे मौन गीत एक उमलते 
तुझा सुर माझे गाणे तूच पुन्हा हरवते॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...