शुक्रवार, ८ मार्च, २०२४

सर्व्हर

सर्व्हर
********
प्रत्येक माणूस प्रत्येक जीवन 
हे एखाद्या सर्व्हर सारखे असते 
ते अनेक तारांच्या गुंत्यांनी 
अनेक ठिकाणाशी जोडलेले असते 
त्या तारा उर्जेने भरलेल्या असतात
त्यातून वाहत असतात 
विचार ज्ञान भावना अविरत

व्यक्त होत असतात नात्यात प्रेमात
ध्येयात धर्मात स्वार्थात त्यागात 
उदात्ततेत मैत्रीत गरजेत 
त्यापैकी काही असतात खूपच बलवान 
त्यांना कोणीही वेगळे करू शकत नाही 
त्या सर्व्हर पासून कधीही
तर काही असतात सूक्ष्म तरल 
लक्षातही न येण्यासारख्या कमकुवत 
पण खूप अर्थवाही

या प्रवाहा मधून वाहत असते जीवन 
थरथरत फडफडत नर्तन करत 
हा जो सर्व्हर आहे हा जो कनेक्टर आहे 
त्याला आपण म्हणत असतो " मी ै

खरं तर त्या मी ला ही काही अर्थ नसतो 
तो फक्त असतो एक माहितीचा खजिना 
अन भावनांचं लटांबर 
बस त्यापेक्षा काही नाही 
तो स्वीकारत  अन पाठवत असतो पुढे 
आवड नावड .प्रीत अप्रीत राग द्वेष 
आशा आकांक्षा महत्वकांक्षा
यांचे सिग्नल तरंग

आणि एक दिवस तो सर्व्हर तो कनेक्टर
होऊन जातो फ्युज्ड
जळतात जीवनाच्या अनेक तारा
 परंतु जीवन कधीच थांबत नसते
ऊर्जेचा प्रवाह तसाच वाहत राहतो
सर्व्हर - कनेक्टर  बदलले जातात 
नेटवर्क पुन्हा स्थापित होते 
जीवन पुढे पुढे जातच राहते 
पण त्या एका सर्व्हर शिवाय
कारण प्रत्येक सर्व्हरचा 
एक बॅकअप असतोच कुठेतरी 
अन्  त्या कृत्रिम अमरत्वाची 
सत्ता सुटत नाही कधीही

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...