रुक्मिणीचे पत्र
************
सागराच्या पलीकडे तुझे घर आहे म्हणे लाटा लाटातून येते नित्य तुझे बोलावणे ॥१
मिटताच डोळे माझे मनोहर रूप दिसे
पुनवेच्या चांदराती सुनिल अंबर जैसे ॥२
लहरत वाऱ्यावर रम्य तुझ्या कथा येती
तुझे गुण कीर्ती मनी मधुरस उधळती ॥३
म्हणतात साऱ्याजणी रूप गुण संपन्न मी
तुजविण मज साठी अन्य वर नाही कुणी ॥४
मनोमनी गाठ मग तुजशी मी बांधते रे
रात्रंदिन ध्यास तुझा तुझ्यातच रंगते रे ॥५
प्रियजन परिणय अन्य कुठे इच्छताती
सोडूनिया वनराज वृका कुणा शोधताती ?॥६
तुझ्या लीला अवखळ तुझे दिव्य यशोगाण
ऐकताना रात्रंदिन चित्त जाते हरखून ॥७
प्राणातील हाक माझी कानी तव येईल का ?
निरोपाचे पत्र येता धावूनी तू येशील का ? ॥८
हवे तर ने वरुनी हवे तर पळवूनी
तुजविण नको मज अन्य काही रे जीवनी ॥९
येरे घनश्यामा ये रे नील मेघा सम ये रे
अन् माझ्या प्रीतीफुला नव संजीवन दे रे ॥१०
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com .
☘☘☘☘ 🕉️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा