******
निरागसतेच्या प्रसन्न वेलीवर
अंकुरलेली कळी
उन्मलित न झालेली
स्व भानाचा डंख न झालेली
अहमचे केंद्र नसलेली
मानवी जीवनातील
सर्वोत्कृष्ट स्थिती
गौर कोमल काया
प्रसन्न मुग्ध हास्य
सर्व जगाचे
स्थळ काळ व्यक्तीचे
आकर्षण करणारे डोळे
अन् जगत मित्राची अलिखित
उपाधी मिरवणारी
ती अबोध निसंगता
त्या तुझ्या आभा मंडलात
दाटलेली मंद चंद्र कला
स्निग्ध रुपेरी किरणांच्या
हळुवार वर्षावात
प्रसन्नतेने बहरलेले
प्रत्येक हृदय
तुझ्या अस्तित्वाने
बांधले गेलेले कितीतरी
चिरपरिचित अपरिचित
व्यक्तिमत्व होती तेव्हा
तिथे त्या सोहळ्यात
सारे तुला आशिष देत होती
कौतुक करत होती
पण मला मात्र जाणवत होती
फक्त तुझी शुभेच्छा
तुझ्या अस्तित्वातून
प्रत्येक हृदयात झिरपणारी
कळत नकळत
कालातित सुखाची आनंदाची
क्षणस्थ अवकाशाची
मंगलमय वर्षाव करणारी.
म्हणून तुला पुन: पुन्हा
धन्यवाद आणि आशीर्वाद .
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com .
☘☘☘☘ 🕉️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा