रविवार, १० मार्च, २०२४

महफ़िल ए यारा


महफ़िल ए यारा
*****

जेव्हा मित्र जमतात 
आणि सुरू होते  मैफील (महफ़िल)
गप्पांची आठवणींची
भिडतात ग्लासाला ग्लास
मोकळी होऊ लागते
मनाच्या थैलीची गाठ

किती किस्से किती गमती 
ऐकलेल्या असूनही 
पुन्हा पुन्हा ऐकतो आपण
जणू मुरलेल्या लोणच्याची
 लज्जत घेतो आपण

कधी आपल्याच 
तर कधी इतरांच्या 
चुकांना किंवा मूर्खपणाला 
हसता हसता 
उतरते ओझे जगण्याचे 
व्यथांचे , दुःखाचे , त्राग्याचे

ती संध्याकाळ 
जी उगवते खूप दिवसांनी 
जमतात पक्षी वृक्षावर 
येतात दूरून कुठून कुठून 

तिथे व्यवहार नसतो कसलाही 
नसते काही देणे घेणे 
माहीत असते प्रत्येकाला
 हे तर आहे आनंदाचे देणे 

जगणे भेटते जीवनाला 
आपले अस्तित्व विसरून 
पद प्रतिष्ठा गुणदोष 
सारे गुंडाळून ठेवून 

आणि कळते स्वतःलाच 
आपली कमाई जीवनाची 
किंमत आपल्या मित्रांची 
आणि त्यामुळेच आपलीही 

तो अमूल्य काळ  
तो अहं विसरलेला काळ 
तो थांबलेला काळ 
तो जीवणातला सर्वात 
सुंदर काळ असतो 

त्या मित्र मैत्री मैफिलीला
उमटतात लाख सलाम मनात 
आणि क्षण बसतात सजून 
मनाच्या कोंदणात

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...