शनिवार, ३० मार्च, २०२४

कळो जावे

कळो जावे
*********
कळणाऱ्या कळो जावे 
भाव माझ्या मनातले 
उतरून डोळा यावे 
रंग सांज नभातले ॥१
तसे तर सारे काही 
शब्दा कुठे कळते रे 
अन स्पर्श भारावले 
विसरती भान सारे ॥२
सलगीत उबदार 
काळ वेळ हरवतो 
कुजनात काळजाच्या 
यमुनेच्या डोह होतो ॥३
कदंबाचे फुल कानी 
हरखून येते गाली 
डोईतील गंध वेणी 
विखुरते रानोमाळी ॥४
भारावते इंद्रजाल 
काळ्या गूढ डोळ्यातले 
अन मनी वितळती 
शब्द धीट ओठातले ॥५
किती दिन किती राती 
आल्याविन येती जाती
हरवून जन्मभान 
कैवल्याचे गीत ओठी ॥६
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...