रविवार, २५ एप्रिल, २०२१

एक्सपिरिअन्स (अनुभवणे)

अनुभवणे
********:
आता प्रेम पुरे झाले 
भेटणे बिटणे पाहिजे सरले 
अरे घरच्यांना आहे संशयाने घेरले 
म्हटली ती त्याला 
अन तिने त्याचा अखेरचा निरोप घेतला 
ओके म्हणाला तोही तिला 
अन त्याने आपला रस्ता धरला 

किती सहज संपली ती कथा 
जसा की  पायातून सहज निघावा काटा 
मग ती गेली नाचतच घरी 
तोही परतला निमूटपणे आपल्या दारी 

मग जे घडले ते काय होते 
जणू काही मनाची खेळणे होते 
किंवा अतृप्त अनुभूतीचे 
पुन्हा उगवून येणे होते 

ते भेटणे ते बोलणे 
रुसणे आणि रागावणे 
ते मिठीत बहरणे 
ते ओठांचे थरथरणे 
ते होते का 
so called experience  घेणे
अनुभवामधून जाणे ?

मदिरेचा कैफ असतो तरी कसा ?
गांजा डोक्यात भिनतो तरी कसा ?
स्वप्ने अफुची कशी बरी सुखावतात ?
गर्द हशिम रंगात कुठल्या घेऊन जातात ?
तसेच काही असावे हे अनुभवणे 
तिचे अन त्याचेही 

एकदा नशा केल्यावर 
त्याची लत लागतेच असेही नाही 
अन समाजाची घरादाराची 
बंधनेही असतातच काही 
नशेसाठी असावी लागते 
एक बेदरकार हिंमतही 
कुठल्या लैला मजनू सारखी 
हिर रांजा सारखी 
ती नव्हतीच
त्याच्यातही अन तिच्यातही.


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ठसा

ठसा **** जया प्रकाशाची हाव   ज्याचे आकाशाचे गाव  त्याचे दत्तात्रेय ठाव  ठरलेले ॥१ जया कळते बंधन  जरा जन्माचे कारण  तया दत्ताचे स...