****
तळपते उन असो वा कडाक्याची थंडी
सदैव आपल्या कामामध्ये
हरवून गेली असे ती
लागेल ऊन फाटेल कांती
तिला मुळी क्षिती नव्हती
किती वेगळी होती ती
काय म्हणू तिला न कळे
वेरूळातील सुंदर लेणे
लोकगीत वा कुणी गायले
गर्द हिरव्या रानातील
अनाम फुल वा गंध भारले
खळखळत्या झर्यासारखे
तिचे निर्मळ सरळ बोल
मृदगंधाने मोहरलेली
तिच्या शब्दामधील ओल
नव्हता गर्व अहंकार
पण करारी स्वाभिमान
जनप्रिय ती मन मोकळी
छक्के पंजे या जगताचे
ठावुक असूनी ठावूक नसली
अशी माऊली जगावेगळी
कणखर शीतल साधी सावळी
होती जणू माझ्या जीवनी
आनंदाचा मेघच बनली
गेला वर्षा ऋतु बरसून
जीवन सारे आले उमलून
वाहू म्हणतो तिला सुमन
हरवून गेले परी ते चरण
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘☘☘
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा