बुधवार, २१ एप्रिल, २०२१

येई रामचंद्रा

येई रामचंद्रा
**********

येई रामचंद्रा 
पतित पावना 
रिपु या मर्दना 
छद्मचारी ॥१॥

डोळीया दिसेना
हातास येईना 
मारता मरेना 
काही केल्या ॥२॥

हतबल प्रजा 
हतबल राजा 
गुन्ह्याविन सजा 
पामरांना ॥३॥

गांजली धरती 
तिर्थक्षेत्र ओस
मरण हौदोस
ठायी ठायी ॥४॥

म्हणती कोरोना 
शब्द मुकुटाचा 
परी करूणेचा
लेश नाही॥५॥

झुंजती लेकरे 
मरती लेकरे 
लवकरी ये रे 
पद्मनाभा ॥६॥

दिनांचा दयाळू 
सदा लोकपाळू
कृपा आळुमाळू 
देई गा बा ॥७॥

सरू दे संकट 
विश्वाचे विकट
मागतो विक्रांत 
तुज देवा ॥८॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...