गुरुवार, २९ एप्रिल, २०२१

स्वामी माधवानंद


स्वामी माधवानंद
(आज दि.२९.४.२१ स्वामींचे महानिर्वाण  झाले)

पाय  हरवले 
हृदया मधले 
सदैव पूजिले 
आदराने ॥१
मार्ग दाखविता 
सखा हरवला 
रिताची जाहला 
गाभारा हा॥२
रसिक राज तो 
बहुगुणी साचा 
मित्र जगताचा 
प्रियकर ॥३
सोहम मधला 
स कार समोर 
घेऊन आकार 
उभा होता ॥४
उर्जेचा प्रवाह 
राष्ट्र हितकारी 
हिंदुत्व आधारी 
वैज्ञानिक ॥५
गुरुपदीचा जो
सदा रहिवासी 
स्वानंद निवासी
आत्मराज ॥६
स्वरूपी ठसला 
दीप पाजळला 
दिसे पसरला 
कृपा कर ॥७
मार्मिक बोलणे 
मृदू विनोदाने 
वेदांत सांगणे 
सहजिच ॥८
ज्ञानदेव चित्ती 
रामदास मती 
निसर्गदत्तादी 
जिव्हेवरी ॥९
ऋतंभरा प्रज्ञा 
देही वागविता 
परंतु अहंता 
शून्याकार ॥१०
किती उधळले 
ज्ञानाचे भांडार 
गुण रत्नाकर 
महाराशी ॥११
किती जमविले 
आत्म प्रेमीजन 
ह्रदयी  भजन 
पेटविले ॥१२
स्वामींचा माधव 
ताईंचा राघव 
भक्तांचे लाघव 
अतिप्रिय ॥१३
कळेना मजला 
अवघा सुंदर 
सजला संसार 
उधळे का ॥१४
दधीची करणी 
केली काय स्वामी 
सामोरी जावूनी 
महाकाळा ॥१५
सांभाळण्या पिले 
धावली माऊली 
कुडी झुगारली 
प्रेमे काय ॥१६
स्वरूपी रमला 
देह काय त्याला 
आला अन गेला 
पर्वा नाही ॥१७
परी ही अज्ञानी 
हिंपुटी लेकरे 
सैरभैर सारे 
भांबावली ॥१८
माऊलीये कृपा 
सदैव राहील 
अवघ्या तारील 
सूक्ष्मातून ॥१९
तुम्ही शिकविले 
जरी जाणे तथ्य 
देह धन मिथ्य 
सारे आहे ॥२०
परी हरविता 
पुजते ते पाय 
व्याकूळ हृदय 
माझे होई ॥२१
भेटीगाठी विन 
जरी होत्या भेटी 
मानस ती मूर्ती 
पूजनीय ॥२२
परी दूर कुठे
अस्तित्व आकार 
मनास आधार 
देत होता ॥२३
जरी निराकारी 
आता वस्ती असे 
कृपा ही बरसे 
तैशी ची ती ॥२४
सगुण प्रेमाची 
सगुण ही ओढ 
सुटता सुटत 
नाही तरी ॥२५
विक्रांत दुरस्थ
होता आकारत 
स्वामी ह्रदयात 
धरूनिया ॥२६
मिटताच डोळे 
स्वामी अंतरात 
दिसती सस्मित 
परिचित ॥२७
डोईवरी हात 
भ्रुमध्यात स्पर्श 
आषाढीआकाश
आठवतो ॥२८
बीज लाभलेले
उगवुनी आले 
सांगणे राहिले 
परी अंती. ॥२९
एवढीच खंत 
आहे अंतरात 
सांगतो विक्रांत 
सखयांनो ॥३०


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दत्त बडवतो

दत्त बडवतो ********* दत्त बडवतो मज बडवू दे  दत्त रडवतो मज रडवू दे  फटका बसता जागृती येता कुठे जायचे मज कळू दे  ॥१ प्रवाही वाहून ...