बुधवार, २८ एप्रिल, २०२१

तुझे शब्द

तुझे शब्द
*********

तुझे शब्द कानावर 
शिणलेल्या मनावर
थेंब जसे पावसाचे
तहानल्या भूमीवर

प्रदिर्घश्या प्रतिक्षेची
झाली क्षणात अखेर 
मृदगंध मोहरला 
तापलेल्या माळावर 

असुनिया मनात या 
किती तू रे दूरवर 
चंद्र असे जरी नभी
अवस या डोळ्यावर

म्हणतात भूमीला या
शाप आहे अवर्षणी
इथे कधी येत नाही
आवेगाने ऋतुराणी 

ठिक आहे मंजूर हे 
दिले दान नशिबाने 
वळवाचे भाग्य माझे
भोगतो मी आनंदाने 

तुटेल का शाप पाश 
तुझ्या शब्दांच्या शरांनी 
उगवेल का पहाट ती
वाट पाहीली शिणूनी


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ठसा

ठसा **** जया प्रकाशाची हाव   ज्याचे आकाशाचे गाव  त्याचे दत्तात्रेय ठाव  ठरलेले ॥१ जया कळते बंधन  जरा जन्माचे कारण  तया दत्ताचे स...