*****
मला वाटतं
मृत्यूनंतर माणसातील प्रेम
अलगद बाहेर पडतं
अन कुठल्या पानात
कुठल्या फुलात कुठल्या रानात
जावून बसतं.
अन मिळताच एक हळवं मन
त्यात हळूवार प्रवेश करतं.
तेव्हा ते अगदी नव कोरं असतं.
स्मृतिचा कुठलाही डाग नसलेलं.
जन्माला येणार्या बाळासारखं.
नाहीतर हे जग संपून गेलं असतं.
कारण प्रेम कुठ पिकत नाही
प्रेम कुणी विकत नाही
प्रेम कधीच मिळत नाही
चोरुन वा बळजबरी करून .
प्रेम स्वत:च ठरवतं
कुठे राहायच !
मवाळ मृदू संवेदनशील मन
समजंस त्यागी जागरूक मन
त्याहूनही
मोकळं मुग्ध अन रिक्त मन
तिथं प्रेम रूजतं वाढतं फोफावतं
त्या प्रेमाला
खरंच काही प्राप्त करायचं नसतं
आपल्या असण्यात राहायचं असतं.
अन ते राहतंही .
म्हणूनच ते प्रेम असतं
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘☘☘
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा