बुधवार, १४ एप्रिल, २०२१

डॉ.बाबासाहेब

डॉ.बाबासाहेब 
🌾🌾🌾


काल रात्री बारा वाजता 
अचानक 
आकाशात उडू लागले फटाके 
दुमदुमू लागले आवाज 
आश्चर्य वाटले 
दिवाळी !
अशी अचानक 
खिडकीतून डोकावून बाहेर पाहिले 
तर काही वस्त्यांमध्येच 
ही धामधूम चालू होती.
आणि लक्षात आले 
अरे आंबेडकर जयंती सुरू झाली 
हि भिमाच्या अनुयायांची दिवाळी आहे.

बाबासाहेबांविषयी इतकी श्रद्धा 
इतके प्रेम आदर 
या समाजामध्ये निर्माण झाला आहे 
की ते बाबासाहेबांना 
निश्चितच 
प्रेषित मानू लागले आहेत 
देव मानु लागले आहेत

प्रेषित येतो 
आणि बाहेर काढतो लोकांना 
त्यांच्या दुःखातून दैन्यातून 
देतो ज्ञानाचा मुक्तिचा प्रकाश
प्रदान करतो माणुसकीचे हक्क 
वागवतो माणूस म्हणून . .
माणसाला यापेक्षा 
निराळे तरी काय हवे असते.

कारण मानवी मनाला 
हवे असते एक दैवी स्थान 
पूजनीय स्थान 
जे त्यांच्या आत्मसन्मानाला 
अभिमानाला 
उंचावर नेऊन ठेवेल 
हवे असते
एक श्रद्धास्थान .
आणि जर 
एक नष्ट झाले तर 
तिथे दुसरे उभारावेच लागते 

कारण मानवी मन 
नाही राहू शकत त्याशिवाय 
माणसाला हवा असतो 
प्रेषित 
महापुरुष 
पूजा करायला 
इथून तिथून सर्व जगाच्या पाठीवर

 हिंदू धर्म ,संस्कृति 
यांना नकार दिल्यावर 
झालेली पोकळी भरून काढणे 
आवश्यकच होते .
त्यामुळे बाबासाहेबांना देवत्व मिळणे 
क्रमप्राप्त आहे .
कदाचित त्यांना स्वत:ला 
ते अभिप्रेत नसेलही.

अर्थात बाबासाहेब 
महामानव होते यात शंका नाही
कित्येक शतकानंतर 
अशी विभुति जन्मास येते .

पण
मला भिती वाटते 
ती वेगळ्याच गोष्टींची
कारण ज्या क्षणी 
एक मोडून दुसरे
नवे श्रद्धास्थान निर्माण केले जाते
त्याक्षणी माणसाचे मन  
एकांगी होते 
अधिक कट्टर होते 
आणि जुने श्रद्धा स्थान 
पुसून काढण्याचा 
आटोकाट प्रयत्न 
त्या मनाकडून केला जातो

सामाजिक राजकीय गरजेमुळे 
कदाचित ते बर्‍याचवेळा
अप्रकटपणे प्रकट होते
पण आपल्याच ग्रुपमध्ये 
ते अधिक  तीव्रतेने 
अधिक जाहीरपणे मांडले जाते
प्रकट केले जाते

कदाचित एका म्यानात 
दोन तलवारी राहात नाहीत 
तशाच एका मनात 
दोन श्रद्धाही राहत नसाव्यात
दोन संस्कृती रहात नसाव्यात
किंबहुना त्या तशा राहू नयेत 
अशीच काही समाज प्रमुखांची 
नेता मंडळींची इच्छा असते.

खरतर बाबासाहेब 
एका समाजाचे वर्गाचे असे नाहीत 
तर ते या भारत भूमीचे सुपुत्र आहेत
इतके दूरदर्शी
इतके विद्यावान बुद्धीमान
सूक्ष्मातिसूक्ष्मात जाऊन 
विचार करणारे विचारवंत 
माणुसकीने ओथंबून गेलेले 
महामानव.

पण त्यांना विभुतिपुजनासाठी
स्वत:च्या स्वार्थासाठी
केवळ मुर्ती म्हणुन वापरले
तेव्हा .
त्यांना कट्टरतेच्या झेंड्याखाली  
आणून स्थापित केले जाते 
तेव्हा
ती न  भरलेली दरी
मला जाणवत राहते 
पुन्हा पुन्हा .

बाबासाहेबांवर गौतम बुद्धावर  
अन मानवतेवर 
अत्यंत प्रेम करणार्‍या  
माझ्यासारख्या
वर्णाश्रम नाकारणार्‍या 
पण हिंदुच्या आत्मज्ञानाधारित
शिकवणुकीवर  
जन्म जगणार्‍या 
व्यक्तिला खरेच खुप वाईट वाटते.

बाबासाहेबांना कोटी कोटी प्रणाम .!!


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...