शनिवार, १० एप्रिल, २०२१

हिरवाई

हिरवाई
*******

पाचूचे अंगण पाहिले दृष्यात
बुडालो आकंठ जीवन रसात 

हिरवा साज या वृक्षांनी घातला 
हिरवा शालू नि भूमीने नेसला

गडद हलके पोपटी पिकले 
अनंत छटांनी रंग उधळले 

हिरव्या झुडपी हिरवी सळसळ
हिरव्या डोहात हिरवी खळखळ 

निळ्या नभास या हिरवी आहट 
निळ्या ओढ्यावर हिरवे सावट 

शब्द स्तब्ध झाले मन मौन झाले 
पाहून हिरवाई चिंब चिंब ओले 

तन हिरवे झाले मन हिरवे झाले 
निळ्या शिरातले रक्त हिरवे झाले 

हिरव्या डोळ्यात स्वप्न सुखावले
हिरवे होवून गाली ओघळले

भान हिरवे झाले गाणं हिरवे झाले 
देही भारावले प्राण हिरवे झाले  


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...