रविवार, ३१ मार्च, २०१९

स्वाधीन दत्ता




अजून अंधार 
असे सभोवार 
स्वप्नांना आधार 
डोळियांचा

तुझ्या प्रकाशाचा 
इवला किरण 
येईना दिसून
मज दत्ता 

भक्त म्हणवितो
जगी मिरवीतो 
कोरडा दावितो
आड जगा

व्यर्थ वाहे देह 
उगा पंचप्राण 
वाटते टाकून 
द्यावे आता

साऱ्याच कळ्यांनी 
यावे उमलून 
असे का लिहून 
ठेवियले

सारी फळे नी 
पिकावी म्हणून 
वृक्ष का  हटून 
बसतसे 

जशी तुझी इच्छा 
यावे ते घडून 
तुझिया स्वाधीन
होतो दत्ता 

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शुक्रवार, २९ मार्च, २०१९

आसक्ति

आसक्ति
*******

कुणा आसक्तीत
वाटे महासुख
दिसे कुणी एक
भोग मग्न ॥

काय ते अवघे
आहे सम्मोहित
किंवा संभ्रहित
मन माझे ॥

वाटेचा उगाणा
लागता लागेना
आशेचा फळेना
वृक्ष येथे ॥

चालतो म्हणती
तया पथावर
अन्यथा व्यापार
सुटेचि ना ॥

असेल शेवटी 
रिक्त हस्त अंत
आणिक पायात
तेच चक्र ॥

विक्रांत संपली
असे सारी हौस
जगाचा उरूस
पाहण्याची ॥

दत्ता डोळीयांचा
सरू देत सारा
ज्ञानाच्या माहेरा
नेई मज ॥

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

बुधवार, २७ मार्च, २०१९

दत्त सावरीता



दत्त सावरीता
***********

दत्त सावरता 
अंधारी पडता 
विषयी धावता 
वेळोवेळी॥

दत्त सांभाळीता 
संसारी धबाडी 
करिता कबाडी 
प्रारब्धात॥

दत्त सोडविता 
मरण कावडी 
देऊन तातडी 
भावभक्ती ॥

दत्त आवरिता
रडता पडता 
देऊनिया हाता 
कुण्या रुपी ॥

दत्त मोक्षदाता 
शरण पतिता
जप तप हाता 
शुद्ध कर्ता ॥

दत्त प्रेम दाता 
विक्रांत अनाथा
 पथी चालविता 
कृपासिंधू ॥

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे


मंगळवार, २६ मार्च, २०१९

माताजी निर्मलादेवी















माताजी निर्मलादेवी 
(मी माता निर्मला देवीचा भक्त नाही किंवा त्यांचा सहज योगाचा अनुयायी सुद्धा नाही 
तरीही एक दिवस एका ठिकाणी अनपेक्षितरित्या जाणे झाले 
तिथे निर्मला देवींचा एक छान मोठा फोटो होता 
त्यासमोर नुसताच बसलो होतो तेव्हा आलेला हा अनुभव .)

चैतन्य सळाळे 
फोटोत सजले 
पूजा पालवले 
भक्तांचिया ॥
कृपेचा प्रसाद 
होता ओघळत 
प्राण उर्ध्व होत
आसमंती
कां ग माय अशी 
करिशी करूणा 
जरी मी पाहुणा 
तुझे दारी
 कैसी ही घडी नि
 कैसे येणे जाणे 
परी तुझे देणे 
कालातीत 
माता निर्मलाजी 
माय जगताची 
सहज योगाची 
अधिष्ठात्री ॥
आई जगदंबा
काय वाणू तुला 
लागतो पायाला 
विक्रांत हा ॥

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे




सोमवार, २५ मार्च, २०१९

मासेवाली


मासेवाली
********

पुन्हा पुन्हा मुन्शिपाल्टी 
जरी तिचे छत तोडी
पुन्हा पुन्हा मासे वाली 
नवे आणूनियां जोडी 

झाडाखाली तिच्या तीच
हक्काचीच असे जागा 
टाप नाही कुणाचीच 
घेण्या तिजसी रे पंगा 

पापलेट सुरमई 
वाम बांगडे करली
झिंगा कोळंबी मांदेली
पाटावरी मांडलेली 

जरब डोळ्यात तिच्या 
शब्द आणि धारधार 
नजरेत येणाऱ्याला 
एकाच ती तोलणार 

सोन्याची माळ गळा 
कुंकू भाळी लावलेले 
अबोलीच्या वेणींमध्ये 
फूल कधी खोचलेले

रोजचेच गि-हाइक
बहुतेक ठरलेले
कमी जास्त जरी चाले 
विश्वासाने भरलेले

अविरत कष्ट तिचे 
जीवनाच्या समरात
 रुद्र शांत दिसे काली
 टेंबीयांच्या प्रकाशात 

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे


रविवार, २४ मार्च, २०१९

ॐ गणेश

ॐ गणेश

गणेशा प्रती हे 
मन लाेभावते 
जडून राहते 
निरंतर 

गणेशाची छबी 
येता चित्तावर 
आनंद लहरी 
देह होतो

सूत हा शिवाचा 
अंतक विघ्नांचा 
तारक भक्तांचा 
कल्पद्रुम 

ओघळते सुख 
गणेशासोबत 
दुःख क्षणार्धात 
दूर जाते 

गणेश कृपेने 
दिशा ती दिसती 
गतीही मिळती 
सर्व कार्या

म्हणून तयास 
हृदयी धरावा 
प्रथम वंदावा 
सर्वभावे 

तया प्रकाशाने 
विश्व उजळतेे
आनंदे भरते
कण कण

गणेश भक्ताला 
कसली फिकीर 
हात पाठीवर 
त्याचा सदा 

देवा विनायका
रहा स्मरणात 
शब्द कौतुकात 
विक्रांतच्या

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे


शनिवार, २३ मार्च, २०१९

फकीरीची हाव



फकीरीची हाव
***********

मज फकिरीची
देवा असे हाव
फळण्या उपा
करी काही  

छत आकाशाचे
निजण्या अवनी
ऐसे स्वप्न मनी
सदा सजे  

वृक्षांची संगत
पशूंची सोबत
यामिनीचे तट
भेटो वाटे 

कुठल्या दारात
टिचभर पोट
भरे दो घासात
फार नको 

पानं फुलं कंदी
घडावे पोषण
तुझ्यात हे मन
व्हावे गुंग 

अलख मुखात
अनहलक यावे
तुझाच मी व्हावे
दत्तात्रेया

कुठल्या जन्माचा
असावा हा सोस
विक्रांत उदास
तयाविना 

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शुक्रवार, २२ मार्च, २०१९

दत्ताच्या गावाला


  


भक्त हा चालला
**************

दत्ताच्या गावाला
भक्त हा चालला
जगाच्या डोळ्याला
वेडा हा जाहला
वाटेविना वाटे
हा चालू लागला
अंधारी अंधाराला
नि पाहू लागला

पाहिलेले स्वप्न
खरे मानू लागला
निद्रेत निद्रेला
हा हसू लागला

पथी सोबतीला
न कुणी तयाला
तरी गाव गोळा
करीत चालला

ना इथे थांबला
तो तिथे चालला
भूत भविष्याला
गिळूनी राहिला

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे


http://kavitesathikavita.blogspot.in

पुन्हा एकदा

पुन्हा एकदा ********* पुन्हा एकदा आकाश चांदण्यांनी भरून गेले  पुन्हा अनाम सुखाने मन बहरून गेले ॥ तेच स्थळ तीच भेट देहातील आवेग थ...