दत्ता दत्ता मजला
का तू टाकून गेला रे
हृदयी धरले होते
तरीही का हरवून गेला रे ||१||
मी तो देवा मूढ
भक्तिहीन देही नाडलो रे
षड्विकार सजून सावरून
जगी नाचलो रे ||२||
तू तेजोमणी तुज जवळी
नच तमोगुण फिरे
तुजवीण माझे हारेल
दैन्य अन्य कोण बरे ||३||
तू कृपेचा मेघ भगवन
मज केवळ भक्ती दे रे
सतत राहावा स्मरणी
तू ऐसी एक युक्ती दे रे ||४||
नाम मागतो तुझे
दयाळा मी ध्यान मागतो रे
मन बुद्धी सहित
अहंकार हा तुजला वाहतो रे ||५||
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा