रविवार, २७ डिसेंबर, २०१५

जेव्हा मी तुझा होतो






जेव्हा मी तुझा होतो
खरच का सुखात होतो
कुणास ठावूक खरच पण
काही तरी वेगळा होतो

एक धुंदी होती मनात
अन काळ होता वाहत
तोच तसाच दिवस पण
नव्हता कधी जुना होत

जणू वसंत चिरकालीन
होता मुक्कामाला इथे
थोडे होते तिखट तरीही
जन्म पक्वान्नच वाटे

का न कळे कसे कधी   
वस्त्र फाटले किंवा विरले
सांभाळलेले हातून पडले
दिस जन्म हिशोब बिघडले

आता त्या स्मृतीच दुखावून
करीती जगणे अजुनी जड
तेच विश्व अन असून समोर
भरुनी राहते असह्य तडफड  

होते ऐकले शापित जगणे
असते केव्हा कधी कुठले
प्राक्तन होईल आपले असले
स्वप्नीही मज नव्हते वाटले

दोष कुणाचा गुन्हा कसला
कुणा हातून प्रमाद घडला
असा खेळ व्यर्थ आंधळा
कोण कसा कशास खेळला  


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...