भोगी मनाची निर्भत्सना
होवूनही भोगी मन
उभे राहते लाळ गाळत
जिव्हा लोलुप श्वानागत
त्याच दारात
कधी शब्दांचे फटके
हाड हाड होणे
कधी भिरकावल्या दगडाने
जीव कळवणे
जणू प्राक्तन भोगणे
अटळपणे
मग प्रक्षुब्ध अपमानाने
शपथ घेवून जाणे
पण रक्तात पसरताच
उपभोगाचे रसायन
भारावलेल्या मंत्राचळागत
पुन्हा येवून थांबणे
त्याच दारात
पुनःपुन्हा
मारूनही मन मारत नाही
सांगूनही मन ऐकत नाही
देवूनही पोट भरत नाही
जन्मोजन्मीची वासना
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा