बुधवार, २४ डिसेंबर, २०१४

मनावरी वळ जरी





काही शब्द फक्त इथे
बाकी सारे जग रिते
नव्हतेच माझे कधी
जपलेले काही कुठे

दिसभर मनामध्ये
रुणझुण वाजणारे
रातभर कानामध्ये
किणकिण करणारे

वाटतात भास होते
उभा जन्म वागवले
शोधुनीही सापडेना
धागे काही जुळलेले

मनावरी वळ जरी
वेदनाही भ्रम वाटे
पोकळीत नसण्याच्या
जाणीवेचा नाद आटे

तरंगतो काळ काही
मिटलेल्या मनावरी
त्याच त्याच प्रेतयात्रा
वाहतो नि खांद्यावरी

काजळल्या वातीसवे
जाणण्याची आस खुंटे
सावलीचे भिंतीवरी
उमटून चित्र मिटे

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माणूस म्हणून

माणूस म्हणून ****** माझ्या जीवीचे जिव्हार  गेले किती जरी दूर  जीव तुटे तयासाठी  याद येता हूर हूर रक्त माझेच तयात गुणसूत्रांची रा...