किती नाती शोधायची
किती नाती जोडायची
वठलेल्या झाडाखाली
छाया कुणा मिळायची
ऋतू बहराचा जाता
कोण थांबणार इथे
कोण थांबणार इथे
साद घालू नको कुणा
सुखे जावू दे रे त्याते
वठूनही झाड मन
अजून वठत नाही
पाखराचे स्वप्न त्याचे
अजून तुटत नाही
कुठल्याश्या वादळात
तगमग विरणार
दामिनीच्या मिठीमध्ये
देह सारा मिटणार
येणे जाणे तिचे परी
ते ही त्याच्या हाती नसे
अंतरात जळण्याचे
भोग भाळावरी असे
जळूनिया देह असा
होय पेटवण त्याचा
आता पडेल कुऱ्हाड
खेळ संपेन जन्माचा
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा