रविवार, २३ ऑक्टोबर, २०२२

गुरुद्वादशी

गुरुद्वादशी
*********

वाडीचा तो वारा येऊन भरारा 
स्पर्शतो मजला हळुवार ॥
तिथला तिथे तो बोचरा तिखटच जरा 
सोसवतो बरा या देशात ॥
करतसे वार्ता तिथल्या भक्तांची
पूजा पालखीची प्रसादाची ॥
आणतसे गंध तिथल्या फुलांचा 
कर्पूर धुपाचा पाजळल्या ॥
जाणवतो पाया स्पर्श त्या घाटाचा 
प्रदक्षिणा पथाचा वारंवार ॥
म्हटलो देवाला यावे भेटायला 
तुम्हीच जीवाला एक वार ॥
मग दरवळ दाटला भोवती 
मनोहर मूर्ती नयनात ॥
कानी खळखळ कृष्णेचा आवाज 
हृदयात गाज भजनाची ॥
घणाणली घंटा गुरुदेव दत्त 
अद्भुत हा नाद रोमरोमी ॥
विक्रांत मनात द्वादशी पहाट 
उतरलो घाट कृष्णाईचा ॥
सरले संकल्प मोडले विकल्प 
मन निर्वीकल्प दत्त पदी॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०२२

भेटलेला माणूस


भेटलेला माणूस
******

खूप खुप दिवसांनी 
सारे काही असूनही
त्यात कुठे नसलेला
एक माणूस मी पाहिला 

जणू की कुठल्यातरी 
गूढ देशातून आलेला 
देण्यासाठी जणू काही
जगा उत्सुक असलेला 

तरी आणि कुठेतरी 
कसा काही गुंतलेला 
लोकेषणा असावी का 
असावा धर्म जागला

कुणास ठावुक पण
हा माणूस आवडला 
खोल खोल त्याच्या आत 
एक साधू मज दिसला .

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

बुधवार, १९ ऑक्टोबर, २०२२

गाडीवान

गाडीवान
*******

रिकामी रिकामी धावते ही गाडी .
जरी बैल जोडी बलवान ॥

रिकाम्या गाडीला नाही गाडीवान 
नाहीच सामान आत काही ॥

अवघा उतार जीवन अपार 
नाही पैलपार काही कुठे ॥

कुणी ही जोडली कुठे ती चालली 
आठव राहिली नाही कुणा ॥

बैल थकतील रस्ता चुकतील 
किंवा उलथेल गाडी कुठे ॥

विक्रांत नावाची दिसतेय पाटी 
बाकीची माहिती गुलदस्त्यात ॥

दत्ता होई आता तुच गाडीवान 
मुक्कामाचे ठाण दावी मज ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘


मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०२२

बहर


बहर
*****

टाळूनही तुला मज 
का टाळता येत नाही 
लावूनही दरवाजे 
वादळ टळत नाही

पांघरूण देहास तू
किती खोल रुजलेला
वळताच कुस थोडी 
दिसतोस थांबलेला

मी जगतेच भ्रमात 
त्या तुझ्याच  पाहण्यात 
फुलतो मोहोर नवा
बहरून हर क्षणात 

ती झिंग लोचनाची 
या लोचनास यावी 
तव कृष्णकांंती वरी 
मी झुळूक एक व्हावी 

या वेड्या उपमा जरी 
मज त्याच त्याच येती 
प्रत्येक बहरात पण 
आवेग नवीन असती

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘



सोमवार, १७ ऑक्टोबर, २०२२

सोबत

सोबत
******

भक्ती शिणल्या मनात
 झांजा उगाच वाजती 
घोष देवाचा तोंडात 
हाका वाऱ्यात विरती .

जन्म दुःखाचा डोंगर .
जया विश्वासी चढला 
दिसे रिकामा तो माथा 
दुजा पुढे ठेवलेला 

पुन्हा उतार चढाव 
जन्म काळाचा बनाव 
अंती मुठीत आकाश 
तरी चाले धावाधाव 

झाले बहुत खेळून 
आता घ्यावे आवरून 
याच घडी याच क्षणी 
माझे बस्तान बांधून 

किती दमवितो दत्ता 
देई जरा रे उसंत
पथी खिळला विक्रांत
येई करी रे सोबत 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

रविवार, १६ ऑक्टोबर, २०२२

व्हावे


व्हावे
*****

एक आषाढ मेघ होऊन 
ओवाळावा जीव कुणावर 
मागितल्याविन कधी कुणी 
जन्म लुटावा कधी कुणावर 

काय कशास कुणा सांगावे 
डोळ्यातील पण पाणी व्हावे 
अंधार दाटता दीपक लावून 
सूर्य उगवता दूर सरावे 

कुण्या जगण्यास प्रश्न पडता 
दिशा होऊनी उत्तर द्यावे 
अन निरोपी रस्त्याचे ही 
हळुवारसे चुंबन घ्यावे 

घेण्या वाचून देण्यामधले 
सुख नभाला कुणी पुसावे 
जलाशयाच्या पृष्ठावरती 
नसून कधी असणे व्हावे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘


भक्ती अंकुर


भक्ती अंकुर 
**********
स्वप्न रुजले
स्वप्न सजले 
आकाशाविन 
आधारावीन 

बीज फुटून 
अंकुर झाले 
अर्थ जीवना
घेवून आले

या जन्माचे
माहित नाही
त्या जन्माचा 
पत्ताच नाही

तरीही ठाम 
होऊन बेभान
कातळाला 
उभे भिडले

किती सुंदर
असते फुटणे
आपण असे 
हरवून जाणे 

पर्वा असून 
भान ठेवून
उगा स्वतःला 
वाहून घेणे

इवले बाहू 
कुणी पसरून 
अनंताला त्या 
कवेत घेतले

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...