शनिवार, २३ नोव्हेंबर, २०१९

सुत्रधार अवधुत




सुत्रधार अवधुत
***********
चाले पोर खेळ
अवघा गोंधळ
श्रीदत्ता सांभाळ
जगाशी या
लबाड नाठाळ
करी चळवळ
हट्टांचे केवळ
मुर्त रुप
कधी होती पोर
कधी होती थोर
कधी होती चोर
सहजीच
तया हवा खावू
सारा गोड गोड
तया साठी धाड
घाली कुठे
देवून थकलो
सांगुन दमलो
कधी रागावलो
व्यर्थ पणे
करी ते सज्ञान
देई काही भान
जगाचे कल्याण
घडो मग
विक्रांत उगाच
करी हळहळ
जर सुत्रधार
अवधुत
© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

भक्तीचिया वाटा




***
देहाची फिकीर 
आहे रे कोणाला 
तुजला वाहिला 
दत्तात्रेया॥

जगाची फिकीर 
आहे रे कोणाला 
तुच भरलेला 
दिसे येथे ॥

प्राप्तीची फिकीर 
आहे रे कोणाला 
प्रेमी आळविला 
तूची मस्त ॥

प्रेमाचा आकार
कळे ना कुणाला 
मनी दाटलेला 
देवा तुच  ॥

पाहू जाता सारे 
गमे इवलेसे 
तव प्रेमा पिसे 
भुललो रे ॥

देई तुझे प्रेम
विक्रांता या दत्ता 
भक्तीचिया वाटा 
नेई बळे ॥



© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
**

शुक्रवार, २२ नोव्हेंबर, २०१९

ज्ञानदेवा


ज्ञानदेवा
*******

मागतो तुजला
एकच मी दान
कृपेचे कवन
करि मज ॥
जरा हे शब्दांचे
तेज मावळून
घडू दे दर्शन
गाभ्यातले ॥
मागतो चांदणे
चकोराच्या चोची
प्रभा निरभ्राची
दिसो मज ॥
थिल्लराचे जीणे
नको नको आता
व्हावा मी वाहता
महा ओघ  ॥
परी घडे सारे
तव कृपा बळे
एवढेच कळे
मज लागी ॥
म्हणूनिया पायी
ठेवी सदा माथा
सांभाळ विक्रांता
ज्ञानदेवा॥
***
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http ://kavitesathikavita.blogspot.com

मन देव




मन देव
 ***
मना ओरखाडे
नसावे मनाचे
प्रहार शब्दांचे
कधी काळी

मनाचे सुमन
मनाच्या हातांनी
जपावे हसुनी
सर्व काळ

मनाची देवता
ईश गुरुदत्त
दिसावा सतत
मज तिथे

तिथे बसलेल्या
पुजावे देवाला
जरी त्या देहाला
भान नसे

ऐसी  मती देई
विक्रांत पामरा
दत्त प्रभुवरा
मागणी ही
****

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
**

गुरुवार, २१ नोव्हेंबर, २०१९

दत्तात बुडून


***
व्यापुनी राहावा 
श्रीदत्त सतत 
माझिया श्वासात 
नाम रुपे

हृदयी वसावा 
स्पंदनात दत्त
रक्त कनिकात
एकएक

डोळ्यांनी पाहावा
दत्तची सुंदर
आत नि बाहेर 
भरलेला 

कानांनी ऐकावा 
रव दत्त दत्त 
अणुरेणूत 
साठलेला 

अवघाचि व्हावा
रस रंग गंध 
स्वतः अवधुत
मजसाठी

विक्रांत वहावा 
घट हा भरुन
दत्तात बुडून
तनमन



© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
**

बुधवार, २० नोव्हेंबर, २०१९

तेजे सिस्टर

तेजे सिस्टर
*******
माझ्यासाठी तेजे सिस्टर म्हणजे
अतिशय सोपे सरळ व्यक्तिमत्त्व
जेवढ्यास तेवढे बोलणाऱ्या
कमीत कमी बोलणाऱ्या
कामापुरते बोलणाऱ्या
त्यामुळे दिसायला
हे एक सोपे गणित होते
सोडवायला मात्र
मोठे अवघड होते .

आपण बरे की आपले काम बरे
आपले आठ तास
महानगरपालिकेला द्यायचे
नीटपणे कर्तव्य करायचे
पण जास्त खोलात शिरायचे नाही
उगाचच इन्व्हॉल्व व्हायचे नाही
असा एक सहज समंजसपणा
 त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये आहे
थोडक्यात म्हणजे
डोक्याला त्रास करून घ्यायचा नाही
असे हे एक त्यांचे साधे सोपे सूत्र होते
पण कामात कुचराई करायचे नाही
कामासाठी काम असे
एक सरळ धोरण ठेवून
त्यांनी काम केले

आपले अस्तित्व सिद्ध करणे
अधोरेखित करणे
हे बहुतेक लोकांना आवडते
कधी पदाच्या साह्याने
कधी गटांच्या सहाय्याने
कोणी कोणाच्या ओळखीने
लोक आपले महत्त्व मांडू पाहतात
पण त्या वृत्तीचा पूर्ण अभाव
मी तेजे सिस्टरा मध्ये पाहिला .

मिळून मिसळून राहणे
प्रेमाने राहणे
अन् प्रेमाने जगणे
बडेजाव न मिरवणे
हे त्यांचे वैशिष्ट .

कदाचित घार उडे अंतराळी
तिचे लक्ष पिलापाशी
अशीही एक भूमिका त्यामागे असावी
असे मला वाटते
तर अश्या या
एका शांत संयत सोशिक
व्यक्तीमत्वाला हा निरोप आहे .


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
***

भोगाची नावड



 
********
भोगाची नावड
नको मज दत्ता
धन मान सत्ता
पुरे आता .

निखळ ती भक्ती
देणार तू कधी  
अजूनही थोडी
ओढ जगी .

अजून मोहाचे
सुंदर मंदिर
येते डोळ्यावर
माझ्या दत्ता

अजून सुमने
मन वेडावती
गंधात वाहती
स्वप्न सान

अजूनही वसने
जगा मिरवणे
होते रिझवने
स्वतःसाठी

मावळो  हे जग
आता दत्त नाथा
स्वरूपाची सत्ता
पाहूनिया

बुजगावणे हे
विक्रांत नावाचे
कुणाही शेताचे
राहो मग


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

**

प्रार्थना

प्रार्थना ******* जाहले दर्शन तृप्त झाले मन  देखीले सगुण  परब्रम्ह  हास्य मुग्ध मुखी हात उंचावले  आशिष भरले  प्रेममय  परमपवित्र ...