गुरुवार, २७ जून, २०१९

हरवली पुनव




हरवली पुनव
*********

ते डोळे मिटणारे ते श्वास सरणारे 
अगतिक असहाय ते प्रेम हरणारे 

विशी पंचविशीतले होते वय कोवळे 
जगण्याची आस त्या डोळी एकवटले 

हळू हळू वाढलेली श्वास गती होती वक्षी 
थकलेल्या पिंजरी त्या थकलेला पक्षी 

चुकलेला नेम जणू होता तो काळाचा 
करपला देठ जणू चुकूनिया कळीचा 

दाट केस काळे कुंकू छोटे भालावरी 
खचलेला पतीसवे होता हात हातावरी 

आणि मग गेली ती लढूनिया थकलेली
पुनवच जणू काही अवसेत हरवली 

पण तिचे ते डोळे बोलके नि मोठाले 
विनवणी भरलेले माझ्या जीवनी थिजले 

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
००००००

बुधवार, २६ जून, २०१९

दत्त वसंत




माझ्या मनी पालवला 
दत्त सुखाचा वसंत
गेल्या भरूनिया दिशा 
अवघा आनंदी आनंद॥

चैत्र पालवी सुरेख 
गंध सुमनांचा मळा
स्वर नामाचा विलसे 
फुले कोकिळेचा गळा ॥

वारा उत्तरेचा मंद 
येई सांजेला घेऊन
गंध चंदनाचा काही 
नेई राउळी ओढून ॥

देही उत्सव नटूनी 
मनी ऋतुराज येई
धुंद मोहर जाणिवी 
सुख उघडून जाई

भाग्य आले माझ्या दारी 
तन मनाचे तोरण
होई विक्रांत हिंदोळा 
सुखा थिटे त्रिभुवन ॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
००००००

मंगळवार, २५ जून, २०१९

उताराची वाट



वाटेवरी उतारी त्या 
हात हातात कुणाचे 
भलतेच काय बरे 
वेड्या असे वागायचे

रित भात जगताची 
काय तुला ठाव नाही 
चढ उताराची धाव
मध्ये कुठे गाव नाही

कुणी कुणा सावरावे 
कळण्यास वाव नाही 
कुणी कुठे घसरावे 
थांबण्याचे नाव नाही

जाणणारे अंध डोळे 
अर्थ तोच मोजणारे  
उमटून प्रश्न मनी 
भुवयात अडणारे

सांग बरे तूच आता 
यात असे काय खरे 
उताराचा स्वभाव वा
बहाणा ही वाट धरे

सोमवार, २४ जून, २०१९

दत्ता विसरणे महापाप




दत्ता विसरणे महापाप
**********************

अवघी उद्याची 
चिंता माझी देवा 
घ्यावे तुझ्या नावा
हेचि व्हावी ॥

तुझिया स्वप्नात 
सरो सारी रात
रूप डोळीयात 
दिसो असे ॥

राहो धडपड 
पोटाची पाण्याची 
गाठ कटोर्‍याची 
असो करी ॥

भरो पोट अर्धे 
राहो वा उपाशी 
मजला तयाशी
काय काज ॥

विक्रांत जगणे
असो उणे दुणे
दत्ता विसरणे 
महापाप ॥

 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
००००००


रविवार, २३ जून, २०१९

बाप कृपाळुवा दत्त





********

दिशा गेलेल्या गिळून
जग गेलेले संपू
तुझे अस्तित्व उरले
तन मनाला वेढून 

थेंब पाण्यात सांडला
थेंब वाहता जाहला
थेंब थेंबाचा सागर
थेंब म्हणावे कुणाला 

वाट धुकट धुसर
नभ ओघळे झांजर
उब पदरी बाळाला
तैसे सुखावे अंतर 

सारे दुःखाचे उखाणे
गेले सुखात मुरून
नाव दत्ताचे ओठात
लाज जगाची सोडून 

बाप कृपाळुवा दत्त
सवे नाथांचा संघात
झाला भाग्याचा विक्रांत
तया पायी होतो रत

 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
००००००

शनिवार, २२ जून, २०१९

सुखावलो दत्ता





सुखावलो दत्ता
************

सुखावलो दत्ता
तुजला पाहता
जाहलो वाहता
कोंडलेला

मोहाचा पिंपळ
धुनीत जळला
जन्माचा सरला
एक गुंता

आता विभूतीचे
कौतुक मनाला
लाविले भाळाला
विनोदाने

गाता दत्त दत्त
सरले ते भय
सुखाचे उपाय
ळू आले

नेई मज बापा
हव्या तैश्या वाटा
दत्ता अवधूता
झालो तुझा 

विक्रांत भाग्याचा
चाकर दत्ताचा
चुकार सेवेचा
प्रिय झाला

 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
००००००


शुक्रवार, २१ जून, २०१९

भाषेसी खेळू नका



भाषेशी खेळू नका
************

भाषेशी खेळू नका कुणी
माझ्या मुशीला जाळू नका कुणी
चार टुकार डोक्यांची
हुशारी पाजळू नका कुणी

कैलासाची लेणे माझे
त्यावरी सिमेंट फासू नका कुणी 
इंग्रजळल्या कार्ट्यांसाठी
आईस बाटवू नका कुणी

भाषा तुका ज्ञानेशाची
चांदण्याची वस्त्र ल्याली
चिखलात मूर्खपणाने रे 
तिला लोळवू नका कुणी

एकेक अक्षराचा असे
उंच उंच बुरूज इथे
हलवून पाया तिचा
उगा बुजवू नका कुणी

आकड्यांची जोडाक्षरे
फार काही अवघड नाही
पेलण्यास भाषाप्रेम
काय तुमच्यात धाडस नाही

फिरलेल्या डोक्यांचे त्या
ऐकू नका मुळी कुणी
रे ठेचून काढा तयांना
एक्कावन्न नव्व्यांनो म्हणूनी

 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

नर्मदेच्या काठावर

नर्मदेच्या तीरावर  ************ रस्त्याच्या घड्याळावर पायाचे काटे चालतात अंतर हीच वेळ असते असा प्रवास चाले सतत  कधी भेटतो तीर सु...