शुक्रवार, १० मे, २०१९

सांगी दत्ता




कुण्या कर्मफळे
असे जन्म माझा
आणि काय काजा
सांगी दत्ता ॥

टाक पुसुनिया
साऱ्या कर्मरेषा
जाळूनिया आशा
वर्धमानी॥

थांबो फिरणारे
चक्र कुलालाचे
लक्ष फेरीयांचे
जन्म मृत्यू ॥

रो साटोवाटी
पडलेल्या गाठी
धावणे आटाटी
दिनरात ॥

व्हावे माझी मन
एक दत्त धुन
नित्य निरंजन
अस्तित्व हे 
. © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


गुरुवार, ९ मे, २०१९

दिगंबरासाठी




दिगंबरासाठी 
**************
कुणा घालू गळ 
दिगंबरासाठी 
आंधळ्याची काठी 
कुणा करू ॥

करू धावपळ 
कुण्या कुण्या ठायी 
कोणत्या उपायी 
भेटू तया॥

घेऊन हातात 
माझे पंचप्राण 
देण्या उधळून 
याच क्षणी ॥

कधी सरतील 
प्रारब्धाचे लेख 
जागून अलख 
जीवनात ॥

दत्त पदरव 
ऐकण्या आतूर 
विक्रांत काहूर 
अंतरात ॥


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

*******


बुधवार, ८ मे, २०१९

दत्ता ओठांवरी




दत्ता ओठांवरी 
नाव तुझे येवो
जगण्याची जावो 
उठाठेव ॥

तीच आटाटी 
भरे काठोकाठी
तया साटोवाटी 
नेऊ नको॥

इथे तिथे किती 
मोहमयी पेठा  
नेऊ नको हाटा 
दलालांचा ॥

चालव रे मला 
तुझिया मर्जीन
काट्याकुट्यातून 
हवे तर ॥

चूकू नये दिशा 
हरू नये शा
तुझा प्रेम पिसा
दिगंबरा ॥

विक्रांत थांबला  
मोडलेल्या वाटा 
येई अवधूता
नेई बापा ॥

श्री गुरुदेव दत्त 


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

मंगळवार, ७ मे, २०१९

वाट गिरनार




वाट गिरनार
घाट गिरनार
थाट गिरनार
फार छान ॥

तिथे बैसलासे 
श्रीदत्त ध्यानस्थ 
मु जो अश्वस्थ
जगताचे ॥

भक्तांना आधार
प्रेमळ साचार
वर्षतो अपार
कृपा दृष्टी ॥

सरते पायरी
उरते पायरी
हवीशी पायरी
वाटे सदा ॥

जाहाला दयाळ
श्रीदत्त कृपा
व्यापून आभाळ
जीवनाचे ॥

पाहतो विक्रांत
दत्त हृदयात
डुंबतो प्रेमात
गिरनारी ॥

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


सोमवार, ६ मे, २०१९

दत्त कौतुक




दत्त कृपा २
****
रात्र रात्र जागवतोय 
मी दत्त गीत गातोय  
निज गेलीय उडून 
क्षण सुखाचा होतोय 

डोळा डोळ्याला लागेना 
दत्त कौतुक कळेना 
शब्द धबाबा पडती 
स्तुती थांबता थांबेना

पद करविता तोच 
शब्दां रचियता तोच 
मी तो खेळणे तयांचे
प्रेमे नाचवितो तोच 

गीती स्फुरण गोवून 
गुण पदात ओतून 
दत्त घेतसे सहज 
सेवा माझिया कडून 

किती होऊ उतराई 
जीव ओवाळू तयांसी 
बाप अवधूत माझा 
घेतो विक्रांता पदासी 

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

रविवार, ५ मे, २०१९

दत्त अवतार




दत्त अवतार 
************
तप सतीचे पाहून
सूर मनोमन भ्याले
भोगी हीनदीन झाले 
लोभी ठेव्यासी जडले

तप उजाडण्या तिचे
हेतू शरण ते गेले
ब्रह्मा विष्णु महेशा
त्यांनी साकडे घातले

नाट्य त्रिदेवांनी केले
पुत्र प्रेम स्वीकारले
सत्त्व मातेचे दावाया
तिघे साधुवे ल्याले

नग्न भिक्षा मागूनिया
काही आक्रितही केले
माई पुढती गोंडस
क्षणी बालक ते झाले 

लीला अवतार थोर  
दत्त दुनियेत आले
चंद्र दुर्वासा सहित
भाग्य महिचे वाढले 

लीला विक्रांत वाचतो
क्रिडा दत्ताची वाणतो
माता अनुसया पदी
तन मन हे अर्पितो 

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in







शनिवार, ४ मे, २०१९

दत्त प्रेमाच्या कल्लोळी




दत्त कृपा
***
शब्द अनावर झाले 
भाव अलवार आले 
दत्त कृपेने वादळी 
मन उंच उंच गेले 

येई सुखाचे रोमांच 
डोळा दाटूनिया पाणी 
देह हलतो कंपनी 
प्राण गुंतला गगनी 

प्राण विसावा जीवाचा 
अर्थ कळला जन्माचा 
मेरू भेटला सुखाचा 
आता कोण मी कुणाचा 

येई पदरव कानी 
गंध केशर चंदनी 
देह गेला भारावून
दत्त मनाच्या अंगणी 

दत्त प्रेमाच्या कल्लोळी 
गेली हरवूनी वाणी 
विक्रांत शुन्याच्या घरी
झाला सौभाग्याचा धनी 


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


***

नर्मदेच्या काठावर

नर्मदेच्या तीरावर  ************ रस्त्याच्या घड्याळावर पायाचे काटे चालतात अंतर हीच वेळ असते असा प्रवास चाले सतत  कधी भेटतो तीर सु...