सोमवार, २२ एप्रिल, २०१९

विघ्नराज




विघ्नराज 

करतो रक्षण 
उपाधींपासून 
देव गजानन 
कृपाळूवा 

करतो खंडन 
विघ्नांचे येऊन 
प्रेमे वेटाळून 
सवे नेई 

जाहलो पावन 
तुम्हाला भजून 
अमृत होऊन 
कृपा त्यांची ॥ 

अहा विघ्नराज 
जवळ घेतले
मार्गी चालवले 
साधनेच्या ॥

घडली संकष्टी
देवे कृपादृष्टी 
स्मरणाची प्रीती 
देऊनिया 

विक्रांत चरणी 
जाहला सादर 
भार देवावर 
सोपवूनी॥

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे

रविवार, २१ एप्रिल, २०१९

काळात्मा




काळात्मा

तुझा विनवणी 
करीतो नमुनी 
काळात्मा येऊनी 
छळू नको ॥ 

धर्माची वासना 
करीना छेदन 
हे अंत करण 
शुद्ध राहो ॥

कलिचे सांगाती 
येऊ नको द्वारा 
जाऊ दे रे घरा 
दत्ताचिया॥

तसा तर आहे 
मी तो छळलेला 
भारे वाकलेला 
पापाचिया॥

बाप राखतोय 
म्हणूनही रक्षिला 
अंतरी ठेविला 
अवधूत ॥

विक्रांत कळाली 
कळीकाळ मेख
म्हणूनही विवेक 
मागे दत्ता ॥

श्री गुरुदेव दत्त ॥

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
****

शनिवार, २० एप्रिल, २०१९

दुनियादारी सारी सोड




दुनियादारी सारी सोड 
****************

दुनियादारी सारी सोड 
फक्त एक दत्त जोड 
जाणणाऱ्या जाणण्यास
मोहमाया सारी सोड 

पाठीवरी वाहू नको 
ओझे तेच तेच खोटे 
सुख शोधताना जगी 
मारू नको हेलपाटे 

धन मान यशोगाणं 
काळ लेखी शून्य भान 
भक्ती ज्ञान अन ध्यान 
शाश्वताचे हे चि दान 

कधीकाळी भेटलेला 
देह मान वरदान 
सारे काही त्याग अन
दत्तादारी मारी ठाण

क्षणोक्षणी तोची आहे 
मनोमनी तोची पाहे 
कणकण जगताचा 
वेटाळून तोची आहे  

जाणूनि हे ह्रदयात
विक्रांत आहे नाचत  
रे सुखाचा वर्षावात 
दत्त दत्त सदा गात  

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे

शुक्रवार, १९ एप्रिल, २०१९

अवधूत खेळ




 अवधूत खेळ
*********

स्वप्न सुरंगी
नटले सजले
प्रकाश भिजले 
चांदण्यात   

लहर उठती
मना भिजवती
सुखे उमटती 
पुन:पुन्हा ॥

लहरो लहरी
शीतल ऊर्मी
सजूनी सुमनी
ये गंधात  ॥


घडते वादन
उमटे नर्तन 
रंग सनातन 
जीवनाचे ॥

प्रभो अवधुता   
थकलो आता
तुजला शोधता   
भेट जरा  ॥


श्रीपाद वल्लभ 
अंतरात खोल
बोलावीन बोल
दे विक्रांता   ॥

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

गुरुवार, १८ एप्रिल, २०१९

कृपाळा दातारा





कृपाळा दातारा
************

कृपाळा दातारा
यावे करा त्वरा
वेटाळून जरा
गिळू पाहे

रू आले तेल
जळू आली वात
प्राणांचा संघात
विझू पाहे

व्याधींची गर्जना
करते ठणाणा
स्मरणे घडेना
भक्ती तुझी

होई दत्तराया
ज्ञानाचा किरण
जा प्रकाशून
जन्म माझा

मग विणलेले
वस्त्र हे जळून
जाऊ दे वाहून
ल्या वाटे

विक्रांत व्यथीत
आशेच्या राशीत
उभा हाकारीत
तु दत्ता  
© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

**** 

बुधवार, १७ एप्रिल, २०१९

काय कठीण दत्ता




काय कठीण दत्ता
*********


तुज काय दत्ता
असे रे कठीण
ब्रह्मांडा कारण
श्वास तुझा ॥


जाणतोस देवा
मुंगीचे तू मन
साखरेचा कण
देई तिला ॥


विशाल आकार
जळी जलचर
याचे उदर
भरवितो ॥


अवघे भरून
असे कणोकण
कळल्यावाचून
उगा मीची

माझीही ओंजळ
ठेवू नको रीती
देई तव प्रीती
कणभर ॥


तुझिया विश्वात
तुझा हा विक्रांत
तुजला मागत
प्रेम तुझे 
***


© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


****


सोमवार, १५ एप्रिल, २०१९

दत्त दत्त म्हणो श्वास




दत्त दत्त म्हणो श्वास 
दत्त करो चित्ती वास 
हरदिनी हरक्षणी
मज घडो दत्त भास 

दुनियेच्या गोंधळात 
कानी पडो दत्तनाद
दत्त येथे दत्त तिथे 
कणोकणी पडसाद

दत्त असो सदा साथ
माझा धरूनिया हात
साक्षी प्रभू पाहणारा 
जाणो माझे मनोगत 

असा दत्त पुजियला  
विक्रांतने प्रार्थियला 
हृदयात ठेवूनिया
जन्म दत्ता वाहीयला

जाणिवेत असो दत्त 
नेणीवेत असो दत्त 
कोंदाटून जग सारे 
मला मीच दिसो दत्त     


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in



नर्मदेच्या काठावर

नर्मदेच्या तीरावर  ************ रस्त्याच्या घड्याळावर पायाचे काटे चालतात अंतर हीच वेळ असते असा प्रवास चाले सतत  कधी भेटतो तीर सु...