सोमवार, २ ऑक्टोबर, २०१७

जगदंब



जगदंब
******
मांडवात मंदिरात
माय उभी नटलेली
सांभाळते जगतास
शिरी धरून साऊली ॥

वेडसर लेकरांना
रात्रंदिन प्रतिपाळी
भरवते घास प्रेमी
हर दिनी भुकेवेळी ॥

थोर तिच्या करुणेला
नसे मुळी अंतपार
दया क्षमा शांती प्रेम
जगे तिच्या नावावर ॥

कृपाकण तिचा एक
हाती असा भाग्ये आला
शतजन्म ऋणी तिचा
विक्रांत हा धन्य झाला ॥

जगदंबे तुझ्या पायीं
प्राण माझे अंथरले
प्रेम प्रकाशात तुझ्या
जीणे उजळून गेले ॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

रविवार, १ ऑक्टोबर, २०१७

देई रे दातारा



देई रे दातारा
मागतो ते मला
मग तू  वाटेला
लावा पुन्हा  ।

किती फसवसी
किती ठकविसी
येता मी दाराशी
घालविसी ।

काय मी मागतो
धनमान यश
जाणतो तो पाश
मोहमयी

करी रे विरागी
विषय मोडून
टाक रे फाडून
मनोपट

तृष्णेची इवली
जळो मुळे सारी
कर रे आंधळी
दृष्टी जगा

देह कवतुक
मनाचे लालन
अहम संगोपन
करू नको

ऐक रे विनंती
देई तव प्रीती
अविरत स्मृती
मनामाजी ।

ज्ञान भक्ति विना
येऊ नये चित्ती
विक्रांतची मती
होवो दत्त ।


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogdpot.in

शनिवार, ३० सप्टेंबर, २०१७

विषण्ण दसरा



विषण्ण दसरा

कालच्या विषण्ण करणाऱ्या
घटनेचे मनावर पडलेले घाव घेऊन
आपण साजरा करतोय दसरा.
जीवन मरण सुख दुःखाचे हे चक्र
असेच चालू राहीन
का कसे काही कळल्यावाचून

होय मी नाही लावले तोरण
नाही सजविले गाडीला हार घालून
नाही पाठवले प्रिय मित्रांना 
शुभेच्छांचे संदेश चित्रात गुरफटून
याचा अर्थ असा नाही की
त्यांच्या जीवनात सुख समृद्धी
यावी यावी म्हणून
प्रार्थना करीत नाही मन

सकलांचे कल्याण होवो
सर्व सुखी होवोत
हेच तर आपल्या संस्कृतीचे
कल्याणकारी पसायदान आहे
मागणे आहे
ते तर सदैव मनात उमटत राहीन

पण आज तरी मन
त्या बावीस घरात थांबले आहे
त्यांच्या दुःखाला कवटाळून

डॉ विक्रांत प्रभाकर तिकोणे

शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०१७

प्रेम परिणती



प्रेम परिणती
***********

पुरुषांच्या प्रेमाची परिणती
स्वामित्वाची हवे पणात होते
तर स्त्रीच्या प्रेमाची परिणती
संपूर्ण समर्पणात होते
आदिम पशुत्वाच्या भूमिकेतून
खूप खूप वर उठूनही
त्या पशुत्वाच्या वृत्तीत
सहज विरघळून जातो आपण
पण जेव्हा उमटतो
तिचा त्याच्या स्वामीत्वास नकार
किंवा तो अवमानतो
तो तिचा समर्पणाचा प्रकार
कुठे तरी मोडला जातो
रक्तात भिनलेला करार
आणि अर्थातच करार मोडल्यावर
होते ते फक्त युद्ध
बहुधा शब्दांचे कधी दुर्लक्षाचे
तर कधी मौनाचे
आपापल्या बलस्थानांना वाढवीत
दुसऱ्याला परास्त करण्याचे
अंत माहीत नसलेले किंवा अंत नसलेले
गंमत म्हणजे तरीही लोक
त्याला सहजीवन म्हणतात

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogdpot.in

गुरुवार, २८ सप्टेंबर, २०१७

खुर्ची



खुर्ची
***

इवलीशी खुर्ची
फिरे गोल गोल
झिजलेले बोल
खर्रखर्र ।।

रोखलेले पेन
सदैव तत्पर
नेम लक्षावर
नावडत्या ।।

तिने ठरविली
तीच पूर्व दिशा
आत्यालाही मिशा
म्हणायचे ।।

सदा आखलेली
रेषा लक्ष् मनी
जाता ओलांडूनी
भस्म होणे ।।

असूनही सारे
तिचे कोणी नाही
दिवसांचे वाही
ओझे उगा ।।

अग खुर्ची बाई
करू नको हसे
क्षणाचेच असे
राजपाट 

कधी गंजशील
चाके मोडतील
स्क्रॅप तू जाशील
अचानक

जन शिव्या शाप
जीवासी लागली
सौख्य हारपती
पोखरून ।।

जप ग जीवाला
जप ग मनाला
स्मरून दिसाला
जाणे असे ।।

विक्रांता कळाली
सोडूनिया दिली
परि ना सुटली 
झळ तिची ।।


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
htttp://kavitesathikavita.blogspot.in

सोमवार, २५ सप्टेंबर, २०१७

पाहणारा व पाहणे





कोलेज मधील मित्रा सोबत
आपण थोडे चावट असतो
बायकोबरोबर बाजारात
नेहमीचेच बावळट असतो
आवडीचे पदार्थ बनता
भूक नसून हावरट होतो
पण पाहतो आपण आपणास
तेव्हा थेट तेच असतो

तिथे कुणाचा लुड्बुडणारा
ठेवलेला ठपका नसतो
असाच हा आहे म्हणून
कुणी नाक मुरडत नसतो
फार काय सांगू यार
आपण आपणास नवीन असतो

पाहणारा पाहत असतो
भीडभाड ठेवत असतो
आपले सारे शहाणपण
शेणाचा मग गोळा होतो
मोठेपण पदवी बिदवी
पाटीवरचा शब्द उरतो
धन म्हणजे आकडे फक्त
देह ही हा उसना असतो
पाहण्याच्या दारात आपण
हळू हळू विश्वच असतो
उरले मी पण काही तरी
जाणीवेवर तरंग असतो
खोल खोलवर आत केवळ
अतळ अथांग ठाव असतो
मिटण्याची इच्छा असून
मिटायचे राहून जातो
थोडे धुके थोडी हवा
एक हलका मेघ होतो

“किती काळ बसणार ध्यान
लावूनिया तडासन ?”

शब्द काही कानी पडतो
 एक पडदा उठतो अन
नव्या नाटकी रंग भरतो

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे




रविवार, २४ सप्टेंबर, २०१७

विझलेल्या प्रार्थना



विझलेल्या प्रार्थना

विझलेल्या प्रार्थनांचा दिवा हृदयात आहे
मोजले ना चालणे मी  वाट पाऊलांत आहे

आश्वासन प्रकाशाचे घेऊन जरी रात आहे
हरवला धीर माझा तम काळजात आहे

शोधतो अस्तित्वखुणा ज्ञातही अज्ञात आहे
मानलेली गृहितके मनाची पळवाट आहे

पुन्हा रिते नभ माझे आधार सुटत आहे
सुन्न संवेदना साऱ्या शून्य घनदाट आहे

कसे सांगू कर कृपा मेघा तू आडात आहे
वर खाली होते दोरी जन्म पोहऱ्यात आहे

तसाही विक्रांत आता मानलेली बात आहे
उरलेले शब्द काही उगा रेंगाळत  आहे

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot .in


झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...