शनिवार, २७ मे, २०१७

तो आणि ती




    https://youtu.be/7tUuFIEdoDk



ती...

ती नाचत होती
त्याच तिच्या शैलीत
विलक्षण सहजतेने
दिलखेचक पदन्यासात
अजिंठ्याच्या शिल्पागत

ते तिचे चिरकालीन यौवन
तिच्या मुद्रा तिचे हावभाव
आणि त्यातून साकारणार गाणं
सारे भरून उरले होते मंचावर
मधली सारी सारी वर्ष जणू
भास होता घडणारा पडद्यावर


तो

तो गर्दीतील प्रेक्षागृहात
एकटक नजरेने नृत्य पाहत
त्या दृश्यात पूर्णतः हरवलेला
किंवा कुठल्यातरी
वेगळ्याच क्षणात पोहचलेला

त्या क्षणी तिचे अस्तित्व
जणू तोच झाला होता
कदाचित निरपेक्ष त्रयस्थ
गंभीर अथांग दिसत होता
पण  तरीही पुनवेच्या सागरागत
पुन्हा भरून आला होता


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.in



Inspired by above video

शुक्रवार, २६ मे, २०१७

किती आळवू रे..


किती आळवू रे..
*************

किती आळवू रे
तुला दत्तराया
विरह हृदया
साहवेना ||

वाहते जीवन
कारणावाचून
करावे जागून
काय आता ||

दावतोस स्वप्न
हाती आल्याविन
जाळी रात्रंदिन 
कारे मज ||

कधी भेटशील
काय भेटशील
डोळा दावशील
रूप तुझे ||

खरी काही खोटी
असे माझी भक्ती
परी तुझी कीर्ती
आहे थोर ||

विक्रांत मागतो
पुनःपुन्हा देवा
पदी ठाव द्यावा
मज आता ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


बुधवार, २४ मे, २०१७

पुरे आहे मजला




ते तुझे असणेच इथे बस पुरे आहे मजला 
उगा चांदण्यात बसणे बस पुरे आहे मजला

थकुनिया सांजवेळी येता कधी तव वाटेला
ते तुझे हलकेच स्मित बस पुरे आहे मजला

तुला नको ताजमहाल अन मज रासलीला
गंध क्षण दरवळला बस पुरे आहे मजला

बोलतो न जरी काही तरी तू जाणते मजला   
ते तुझे कळणे सहज बस पुरे आहे मजला

सुख दु:खे तुझी माझी भिडली नाहीत आभाळा
तरीही त्यात तू सोबतीस बस पुरे आहे मजला
                                             
सात जन्म असो नसो कुणी पाहीला काळ फेरा
जन्म हा भरून पावला बस पुरे आहे मजला

भेटलो नकळे कसा मी कसा जाणे सांभाळला
सदा तुझा ऋणी राहणे बस पुरे आहे मजला

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


मंगळवार, २३ मे, २०१७

आर्तीचे व्याकुळ


आर्तीचे व्याकुळ
तुवा सांभाळले
देहासी रक्षिले
कौतुकाने ।।

प्रेमासी विकला
रंग रूपा आला
योग क्षेमी झाला
मायबाप ।।

पोटा दिले अन्न
निवाऱ्यास छत
झाला सदोदित
पाठीराखा ।।

जाणतो मी दत्ता
माथी तुझा हात
संकटात साथ
अहर्निशी ।।

आता फक्त कर
एकची ती कृपा
कोंदाटल्या रूपा
दावी मज ।।

सदा राहो तुझी
मज आठवण
स्वरूप स्फुरण
क्षणो क्षणी ।।

विक्रांत आर्त ना 
जिज्ञासू फारसा
प्रेमाची पिपासा
परी आत  ।।

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.in 



रविवार, २१ मे, २०१७

जगत पसारा




कशाला मांडला
जगत पसारा   
जीवाला उदारा
चैन नाही ||

दु:खाच्या आगीत
जळती पाखरे
मनाचे निखारे
होती इथे ||

सुखाच्या कुशीत
कुणी मुठभर
त्यांचीही अंतर
काजळली ||

तरीही संपेना
सुखाची अपेक्षा
घुटमळे आशा
इंद्रियात ||

विक्रांत सांडेना
दु:ख साचलेले 
निरर्थ वेचले
हवेपण ||

कर कृपा अशी
दत्ता दयाघना
कळू दे जीवना
जगणे हे

एक आस तुझी
मज अवधूता
सांभाळशी भक्ता
हरवल्या  ||


डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे





बुधवार, १७ मे, २०१७

रिक्तता..




रिक्तता..
********

पुन्हा आली तीच
दाटून शून्यता
घेरून जीवना
जाणवे रिक्तता

विझलेले मन
थकलेले तन
सोडण्या जगास
व्याकुळ प्राण

उथळ जगाची
पोकळ वाहणी
पाहून लागते
जीवास टोचणी

कोंडले जीवन
पाच दशकात
दिन सरतात
व्यर्थ अंधारात

कुणासाठी इथे
जगावे कशाला
वठून चालला
वृक्ष हा थोरला

मिटल्या वरती
अवघी विस्मृती
सुख दुःखा सवे
विवश जागृती

अंधारी अंधार
भरला  सरला
आला अन गेला
कुणाला कळला

विक्रांत बुडाडा
वाढला चढला
भ्रमित पोकळी
घेऊन जगाला

हाती न वाढणं
हाती न फुटण
निरर्थ अस्तित्व
निरर्थ जगणं


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


मंगळवार, १६ मे, २०१७

जीवनभास

जीवनभास

आशा खुळ्या मनात रंगवुनी क्षण उलटती
जगणे भास असे हा क्षणात सांगुनी जाती

वाटेवरच्या साऊल्या कधी कुणासच मिळती     
चटके ज्या पावूलास अरे तेच दु:ख जाणती

लाख जाणूनी मोह मनाचे अजुनी नच सुटती
गंध कुठले रंग नवे हे प्राणास ओढूनी नेती

कोंडलेल्या मनात अनवट सूर अजुनी उमटती  
येता कुठली रुणुझुण कानी श्वास हे अडकती

जरी जाणती रानपारधी विभ्रम नवे मांडती
जरा जगूया म्हणून कुणी त्यात उगा धावती

बघतो विक्रांत तिमिरी कैसे किरण कुणा दिसती
मलीन मनी विवश देही कैसे कमलदल फुटती

दाटून चंदन घमघमणारा ही वाट कुठे नेती
पडला कोण सुटला सारी दृश्य कुठे हरवती


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने





दिगंबर आजबे

स्व . दिगंबर आजबे *********** दिगंबर उर्फ डिगा आजबे जामखेड मधील सातवी आठवीच्या वर्गात माझ्याबरोबर शिकत होता . दत्ता आणि डिगा सख्...