सोमवार, २४ एप्रिल, २०१७

तुझी माझी ही कहाणी




शेंडा बुडखा नसली
तुझी माझी ही कहाणी
वेड्या नशिबा आलेली
जाग अर्ध झोपेतुनी

कुणी नशेत कुठल्या
गाठी टाकल्या बांधुनी
मोळी चालली मुकाट
कुठे जळण होवुनी

तश्या येतात कविता
शब्द सवयी मागुनी
कुण्या मनात राहती
ऋतू निर्झराची गाणी
    
अर्थ हरवले सारे
पाणी तळ्यात पडुनी
माळरानी खळग्यात
आले पोपडे उलूनी

चार बांधले कोपरे
चार दशके जगाया
कुणा कळती बाहेर
जरी अंधार एकट्या

भान उतार प्रवाही
त्याला काळवेळ नाही
बीज हुंकारे मनात
उब ओल लागताही

ठसे जागोजागी तेच
तीच उसवली गाणी
जन्म विरतो विटतो
घ्यावा वाटतो रंगुनी

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने


रविवार, २३ एप्रिल, २०१७

माय

माय

काळ्या भयाण रातीला
माय आकाश व्यापून
वस्त्र रात्रीचे कराळ
येते गडद नेसून

माय सावळी सुंदर
डोळी चंद्रप्रभा ल्याली
तेज सावळ्या देहाचे
साऱ्या ताऱ्यात ओतली

गळा रुंड सुमनांची
माळा बांधली कुंतली
हस्त वस्त्र कटीवरी
रंग रुधिरी नटली

माय विशाल नेत्रांची
विश्व काजळी सजली
तिच्या केसाकेसावरी  
कोटी नक्षत्रे ठेवली

माय भीषण सुंदर
माझ्या हृदयी बसली
कणाकणात चैतन्य
रूप जगदंबा झाली

माय रणात वनात
सवे घेवुनिया जाई
बाळ विक्रांत ओटीत
सदा प्रेमभरे घेई

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने

शुक्रवार, २१ एप्रिल, २०१७

जा शोध जा पुन्हा तू



बांधून भग्न गाणी जा वाट ही चालुनी
असेल थांबली कुठे तुजसाठी ती सजनी

अरे दुनिया तशीही बघ थोर फार नाही  
भरुनी जखमा साऱ्या मिटतील वेदनाही

थांबू नको कधीही घेवून मृत्यू मिठीत
तू जीवन प्रवासी रे बांध स्वप्न दिठीत

कानात गुंजणारे सूर आले स्पंदनात
जा प्राण पेटवूनी तू शब्द नवे गुंफत  

देतील तारका तव साथ साऱ्या पथात
उमलेल वाट धरती नीत तुझ्या पावुलात  

जा शोध जा पुन्हा तू जा भेट जा पुन्हा तू
मिळेल शांती जीवा ते स्थान जा शोध तू


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने



गुरुवार, २० एप्रिल, २०१७

तीच परी ती तू ती नाही




तीच परी ती तू ती नाही
*******************

तीच परी ती तू ती नाही
ओठ दुमडली हसली नाही

तशीच नाजूक अवखळ थोडी
परी ती गोडी दिसली नाही

अजून दिसते खपली दुखली
ओंजळ अजून भरली नाही

आता मी तो त्रयस्थ कुणी
नजर तुझी ती फिरली नाही

असे भेटता आज अवचित
खुळी पापणी मिटली नाही

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


बुधवार, १९ एप्रिल, २०१७

वाया घालवला




वाया घालवला

दत्ते नादावला
वाया घालवला
इह दुरावला
भ्रांत पणे ||

आता मार बोंबा
कर तोबा तोबा
दत्तोबा दत्तोबा
साद घाली ||

गोळा करी श्वान
तुकडे घालून
मजेने कीर्तन
मग करी ||

भिकेची करोटी
घेवूनी हातात
घाल रे मातींत
बाप नाव ||

घालूनी लंगोटी
कुल्ले जागा दावी
फुकट घालावी
जिंदगानी ||

विक्रांत फसला
जगास कळला
दत्तमय झाला
मूढपणी ||


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


नवीन वेदना


काहीतरी कारण ती
जगायला शोधतांना
विस्कटल्या दिवसांना 
नीट रचू पाहतांना



भेटलीच तिला पुन्हा
एक नवीन वेदना
विझलेली आग पुन्हा
दिसे धगधगतांना

सावलीची मिठी जैसी
तना मनास स्पर्शेना
स्वीकारून सांत्वनाही
कधी सोबत येईना

कड्याकडे जाणारी ती
जणू काही धुंद वाट
जीव धावतो उनाड
वारा बांधून पायात

सांभाळ ग सखीबाई
दुनिया ही खरी नाही
वेड्या वेंधळ्या मनाची
धाव ही ग बरी नाही

इथे गोष्टी शापांच्याच
मनामनात नांदती
कथा चुकल्या पायांची
धडा होवुनी सांगती

सारे कर्मठ पिंजरे
लाल चाबूक गोजिरे
दाही दिशांना आरसे
मार्ग अडलेले सारे

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

मंगळवार, १८ एप्रिल, २०१७

त्या एकाच क्षणासाठी






त्या एकाच क्षणासाठी
**************** 

त्या एकाच क्षणासाठी 
सार्थकतेच्या स्पर्शासाठी
लावूनी चूड सुखांना 
वेदनाच बांधल्या गाठी 

गात्रात विझल्या चिता
स्मशान सुनेच सारे 
तरीही सताड उघडे 
हे भिंगुळ पिंगुळ डोळे

हे शब्द पाझर कातळ
ठिबकती दुःख नितळ 
ओल पांघरून भिंती 
उगवती दारुण शेवाळ 

करुणेची बांधुनी झोळी 
कुणी गेला वाटेवरूनी
वा भासच हा मनकवडा 
मिरवतो नशा बांधुनी

वक्षात कुणाच्या व्यथा
रुतलेले पायच खोल
पाचूचे माणिक दु:ख
का नखी खरडते ओल

मिटणार कधी हा क्षोभ
विरहात विकल का व्योम
अगणित कृष्ण विवरे
गिळतात निनादी ओम

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...