शनिवार, ११ जून, २०१६

मेघ काळे







माझ्या मनात पाऊस
लाख प्रतिमा नटून
कुणा म्हणावे देखणा
थेंब बसले सजून

ओढ कालच्या पाण्याची
गेली ओघळून दूर
ओल हातात अजून
अन हृदयी काहूर  

जातो भिजून सजून
एक नितळ चेहरा
शाळा सुटता सुटता
थेंब होवून दुखरा

ऋतू चारच दिसाचा
मग चटके मनाला
जग पेटले तरीही
पाणी खोल विहिरीला

एक गाणे पावसाळी
चिरतरुण अजून
मेघ येतात दाटून
त्याच नावाने स्मरून

गाठ कुठल्या सरीची
कुण्या रानात घडते
सय सपकून आत
मन हिरवळ होते

मेघ भरलेले काळे
मोठ्या डोळ्यात सांडले  
माझे दर्पण लाघवी
आता आकाश जाहले  

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/



बुधवार, ८ जून, २०१६

निरर्थ पसारा






अरुंद गल्लीत 
अंधारी महाल
जगणे हलाल
स्वीकारले ||

आजचा हिशोब
बाटलीत बंद
जीवन संबध
मिटलेला ||

जडावलेमन
सुस्तावले तन
उठते चिडून
नाईलाजे ||

करी आटाआटी
चोरी वा चाकरी
लाचार उधारी
ठरलेली ||

किती आले अन
वाहुनिया गेले
कुणी मोजियले
दिन साल ||

अंधार मनात
अंधार जगात
जीवनाची वात
विझलेली ||

कुजले जीवन
वाहते गटार
साचले अपार
खरकटे ||

नवा जन्म येतो
अंधार घेवून
अंधारी पिवून
चालू लागे  ||

कशाला मांडशी
निरर्थ पसारा
सांग रे दातारा
जीवनाच्या ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे  



प्रार्थना

प्रार्थना ******* जाहले दर्शन तृप्त झाले मन  देखीले सगुण  परब्रम्ह  हास्य मुग्ध मुखी हात उंचावले  आशिष भरले  प्रेममय  परमपवित्र ...