सोमवार, ११ जानेवारी, २०१६

एक सैरभैर प्रश्न वाऱ्यावर











एक सैरभैर | प्रश्न वाऱ्यावर |
उगा ताऱ्यावर | चित्र कोरे ||
मनीचे ओघळ | मनातच विरे |
प्रकाश भोवरे | पुंजकांचे ||
ओठीपोटी गोठी | दाटती अपार |
चंद्र अलवार | पाझरतो ||
कोण देतो काय | न ये कळून |
जीव व्याकुळून | स्तना लुचे ||
फुटलेला पान्हा | देही सांडतांना |
भरल्या दिशांना | मोह शुभ्र  ||
अरे मागु किती | भरूनही रिती |
विवरांची दाटी | अंतरात  ||
एक एक फुल | उमले शून्यात |
ग्रह गोलकात | जीवांकूर ||
भरला विक्रांत | सुखाने आकंठ  |
इंद्रायणी काठ | तारांगणी  ||

विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/


रविवार, १० जानेवारी, २०१६

खेळ आता संपव रे






देसी नको ते ते देवा
तुझे प्रेम का न देसी
देह भोगी मोकलसी
तुझी लबाडी ही कैसी

बसविसी उंचावरी
काय ती रे मात्तबरी
तुझ्या पदावीन मज
दुनियाही व्यर्थ सारी

भोगतो रे भोगतो मी
भार सारा वाहतो मी
शम दम तितिक्षेत
तुझा तुला मागतो मी

शांत झाल्या वासना रे
पिकल्यात कामना रे
कल्प द्रुमा तुझ्याविना
अन्य नाही याचना रे

माझे मला दे रे सारे
तुझे तुला घे रे सारे
बघ झाली संध्याकाळ
खेळ आता आटोप रे

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...