गुरुवार, १८ जून, २०१५

धोपट प्रेमभंग






येशील का रे लग्नाला
अखेर म्हटली ती मला
आणि माझ्या मनातला
महाल खाली कोसळला

मित्र म्हणत हुरळत
गेलो होतो गंडविला
गोड मधाळ शब्दांनी
पाळीव केले मजला

स्थळ तिचे जबरी होते
धनिक गाडी बंगलावाले
तसे तिला साजेसेच
हिऱ्यास कोंदण भेटले

तिच्या माझ्या सलगीचे  
किस्से रंगून ऐकलेले
चाळीतले मित्र म्हणाले
अरे असे हे कसे घडले

हसून मी म्हटलो तयां
दोस्तो ऐसाही होता है
सच्चे प्रेमी को हमेशा
बिछाडना ही पडता है

सफल होते तयास का
रे प्रेम म्हणतात कधी
लैला मजनू शिरी फरान
ऐकले नाहीत का कधी

बहुदा त्यांना ते पटले
मित्र मला जपू लागले
आणि गाणी मुकेशची
रोज फोरवर्ड करू लागले

तिच्या लग्नास जायची
पण हिंमत झाली नाही
लग्नास त्या शोभेलसे
नव्हते घरात कपडेही

राजू रामू दत्तू माझी
तशी कहाणी नवी नाही
पण या स्वप्नावाचून
जिंदगीत मजाच नाही

 विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/











मंगळवार, १६ जून, २०१५

तू सभोवती ..





आज तुझ्या अस्तित्वाचा
गंध भोवती दरवळत होता
आणि त्या वेड्या प्रीतीला
 बहर नव्याने येत होता
  
शिणलेली तू कष्ट ओढूनी   
काळ अवसेचा हरवत नव्हता
आणि मी तुझ्यात मिटुनी
क्षण पापणीत ठरत नव्हता

कधी निवळला वादळ वात
देह मना जो कोंडत होता
अन हलक्या ओल्या सरीने 
प्राण पुन्हा पालवत होता

पुढे काय ते मला न ठावे
नवस कधी मी केला नव्हता
तुझ्याच हाती दुनिया सारी   
दुजा आधार मजला नव्हता

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



सोमवार, १५ जून, २०१५

सुखासाठी पैसा





सुखासाठी इथल्या रे
पैक्याविन मार्ग नाही
बाप धनी मारवाडी
गुजराथी शेठ नाही

चिरीमिरी मध्ये आता
भाजीसुद्धा येत नाही
टोलनाक्यावाल्यांना त्या
कसलीच चिंता नाही

राजा लुटे धन मग
प्रधानास भीती नाही
सारे आम्ही निवडले
चोर दोषी मुळी नाही

अरे मी तो इवलासा
उंदीर तो चीज चोरी
असेल ते पाप जर
जावो माझ्या खात्यावरी

शेतामध्ये राबुनी ही
फास घेई शेतकरी
माथा भार जन्मभरी
भिकारीच कामकरी

दारिद्र्यात खितपत
जगणे ते नको मला
वाटेवरी सुखाच्या त्या
चालायचे आहे मला

वाटा इथल्या सुखाचा
हवाय इथेच मला
ओझे पापाचे ते राहो
माझ्या पुढल्या जन्माला

पुण्यवंता जोडू दे रे
सारे पुण्याचे ते साठे
माझे चलो बऱ्यापैकी
सुखी संसाराचे गाडे

 विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/





भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...