रविवार, १४ जून, २०१५

मनाचे खेळ






मन अडकते
धनाच्या विचारात
हिशोबाच्या खतात
नफ्याच्या आनंदात
तोट्याच्या दु:खात
मन अडकतच राहते

मन थकते
प्रपंचाचा भार वाहून
घर ऑफीस अन
बाजारी धावून
तेच तेच पुन्हा जगून
मन थकतच राहते

मन हरवते
नात्यातील खोटेपणात
व्यवहारी नाटकात
मुखवट्यातील जगण्यात
जगाच्या बाजारात
मन हरवूनच जाते

मन खचते
कामातील गुलामीने
उद्याच्या भीतीने
पगाराच्या काळजीने
बेकारीच्या विचाराने  
मन खचतच राहते

मन थांबते
रिटायर होवून
निरोपयोगी ठरवून
अडगळीत पडून
स्वतःत कोमेजून
मन थांबूनच राहते

मन मरते
मरणाच्या भीतीने
विसरून जगणे
हरवून हसणे
होत उदास गाणे
मन मरतच राहते

असे हे मन
का स्वत:ला शोधेल
जगाला जाणेल
कोडे उलगडेल
जगण्यातल
खरेच का हे मन

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

  

शनिवार, १३ जून, २०१५

नागा साधूंना नावे ठेवणाऱ्यांना ...



काढून टाकलेल्या कपड्यांना
घाण म्हणणे फार सोपे असते
मग ते कपडे असोत..
हिंदुत्वाचे,बौधत्वाचे वा ख्रिश्चनीटीचे

पण आपण घातलेल्या
कपड्यांना घाण म्हणणे
अन साफ करणे फार अवघड जाते  
कारण तसे करतांना त्यांना
नागडे होण्याचीच भिती असते

ते असे का बोलतात
याचा विचार केल्यावर लक्ष्यात येते
ती महत्वाची गोष्ट म्हणजे
काढून टाकलेल्या कपड्याची
त्यांची गरजही संपलेली असते
कारण ते असतात सुरक्षित नोकरीत,
गलेलठ्ठ पगारात सुबत्तेतील सजावटीत  
शहरातील अज्ञात एका कोपऱ्यातील घरात   

खरच पुरोगामित्वाची एक
जबरदस्त नशा असते
त्या नशेतील तथाकथित सुधारकाचे  
डोके तर असे फिरलेले असते की
रस्त्यावरील प्रत्येकाला दगड मारणे  
हे त्याचे कर्तव्य झालेले असते
मग नागा साधू त्यांना जगातील
सर्वात अश्लील प्राणी वाटू लागतात
अन सारेच ब्रम्हचारी पाद्री
स्त्रीलंपट दिसू लागतात
जणू काही एक नवीन चष्मा ते घालतात
त्यातून त्यांना दिसते ते फक्त
त्यांनी ठरविलेले.. जे बघायचे ते

आणि ते जगात मिरवू लागतात
कॉलर ताठ करत 
एक नवा पंथ उभारत
ते येतात जातात वाजत गाजत
पण तरीही नीट बघितले तर कळते
अरे हे तर चालतात
भर उजेडातही चाचपडत
जणू फुटलेल्या डोळ्यांचे दरिद्री अंध  
अन त्यांच्याबद्दलच्या कणवेने
ओठी "अरेरे बिच्रारे" हे शब्द उमटतात


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



गुरुवार, ११ जून, २०१५

सदाची कहाणी ..







ते म्हणतात सदा चुकला
भरलेला संसार सोडून  
मोहामध्ये वाहत गेला
काय कमी होते त्याला

घर होते नोकरी होती
फुल फुलले संसाराला
कुणास कळत नव्हते
काय झाले होते त्याला

कळपामध्ये माद्यांच्या
जमा एक करायाला
का अंतरातील तार सूक्ष्म
कुठली तरी जुळायला

नीती नियम संसाराचे
कायद्यात अडकलेले
विजोड जोड किती दिसती
रडत रखडत चाललेले

असा जुगार जिंदगीचा
एखादाच खेळू शकतो
धिक्कार जगी बेअब्रू होवून
प्रेमाला अन तोलू शकतो

तसा तर तो वापरूनही
तिला फेकू शकला असता
पाप लपवून ब्लॅकमेल
सहज करू शकला असता

परी त्याने स्वीकारले तिला  
मात करीत भ्याड मनावर
दुनिया म्हणते सारी जरी  
अन्याय झाला पहिलीवर

पण नियतीचा न्याय तो  
कसा कधी कुणास कळला
दुनियेचा डोळा वरती
घाव आतला कुणी पाहीला

घेता घेता अवघड वळण
दुनिया हातातून सुटली
क्षणात होती हाती अन
क्षणात प्रीती संपली

जन्म लावला पणाला ते
साध्यच हरवून गेले
जरी अभागी जीव एक तो
त्याला प्रेम होते कळले

विक्रांत प्रभाकर








भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...